Chhatrapati Sambhajinagar Crime News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकाने (PSI) लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघड झाला आहे. पीडित महिला गर्भवती झाल्यानंतर आरोपीने तिचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्ती गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी आरोपी PSI तसेच त्याचे वडील आणि बहीण यांच्याविरुद्ध बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यासह इतर गंभीर कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
पीडित महिला आणि आरोपी भागवत ज्ञानोबा मुलगीर हे दोघेही परभणी जिल्ह्यातील. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. जिल्हा एकच असल्याने दोघांमध्ये ओळख झाली आणि नंतर ती संबंधात बदलली.
पीडितेच्या फिर्यादीत म्हटले आहे की, फेब्रुवारी 2024 मध्ये आरोपीने तिला अजबनगर येथील ‘एमएच-20’ कॅफेत नेले आणि तेथे शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकत अत्याचार केला. या संबंधातून ती गर्भवती राहिल्यावर आरोपीने तिचे आणि त्याचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत गर्भपाताच्या गोळ्या जबरदस्तीने घेण्यास भाग पाडले.
गर्भपात झाल्यानंतर आरोपीने तिच्याशी सर्व संपर्क तोडला. त्याचदरम्यान तो PSI परीक्षेत उत्तीर्णही झाला.
प्रकरण उघड झाल्यानंतर पीडित महिलेने आरोपीच्या वडिलांशी आणि बहिणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनीही धमकीच दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. अखेर मानसिक छळ, धमक्या आणि झालेल्या अत्याचाराला कंटाळून ती क्रांती चौक पोलीस ठाण्यात दाखल झाली.
तक्रार नोंदताच सहाय्यक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ‘एमएच-20’ कॅफेत पंचनामा करून पुरावे गोळा केले. प्रकरणाची गंभीरता पाहता सुरुवातीला तपास गोपनीय ठेवण्यात आला. मात्र माहिती समोर आल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त होत आहे.
आरोपी PSI आणि त्याचे कुटुंबीय फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.








