‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ने कोथरुडकर मंत्रमुग्ध

पुणे: विविध रागांतील खास बंदिशी, सुगम गीतांचे बहारदार सादरीकरण आणि नवीनतेची जोड देत सादर झालेली अजरामर गाणी कोथरुडकरांना मंत्रमुग्ध करणारी ठरली. ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’मधून प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांनी आपल्या रागदारीने, गायकीने श्रोत्यांना आपलेसे केले.

कोथरूड प्रभाग क्रमांक ३१ च्या नगरसेविका हर्षाली दिनेष माथवड यांच्या पुढाकाराने आयोजित दोन दिवसीय ‘कोथरूड सुरोत्सव २०२५’चे दुसरे पुष्प राहुल देशपांडे यांच्या गायनाने गुंफले गेले. आयडियल कॉलनी मैदानावर झालेल्या या सांगीतिक मैफलीवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, मोनिका मुरलीधर मोहोळ, हर्षाली माथवड, दिनेश माथवड, नीलेश कोंढाळकर आदी उपस्थित होते.

‘दीप की ज्योत जले’ बंदिशीने मैफलीची सुरुवात करत राहुल देशपांडे यांनी ‘तुज मागतो मी आता’मधून गणेशाला वंदन केले. त्यानंतर हिंदी-मराठी गाण्यांची सुरेल मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. गायिका संहिता चांदोरकर यांची देशपांडे यांना उत्तम साथ मिळाली. अभिनेत्री स्पृहा जोशी हिच्या ओघवत्या व काव्यमय निवेदनाने रसिकांना मोहिनी घातली.

प्रास्ताविकात हर्षाली दिनेश माथवड म्हणाल्या, सुरोत्सवाच्या माध्यमातून पुण्याच्या आणि कोथरूडकरांच्या सांस्कृतिक अपेक्षांची पूर्तता करण्याचा हा प्रयत्न आहे. दोन्ही दिवस मोठ्या संख्येने या उपक्रमाला प्रतिसाद देणाऱ्या रसिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करते. हा महोत्सव यापुढेही फुलत राहावा आणि नागरिकांच्या सेवेची मला संधी मिळावी.”