पुणे: लायन्स क्लबच्या पुढाकाराने लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम, ईको-फ्रेंड्स, कोथरूड तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मानसिक आरोग्यासाठी जनजागृती फेरीचे आयोजन केले होते. सम्यक मेंटल हेल्थकेअरच्या सहकार्याने बाणेर रोड परिसरात ही फेरी निघाली. यासाठी डॉ. रुपाली करवा आणि डॉ. ज्ञानराज चौधरी यांनी मार्गदर्शन केले. येथील नागरिकांशी संवाद साधत फलकांच्या माध्यमातून मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले.
लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल अभय शास्त्री, संयोजक लायन्स क्लब इको फ्रेंड्सचे अध्यक्ष अनिल मंद्रुपकर, लायन्स क्लब झोन-५ चेअरपर्सन रामेश्वर मणियार, प्रकल्प सह-अध्यक्ष आकाश अंबादे, संजना झंवर, डॉ. अस्मिता सुराणा, रजनी अंबादे, आशा मणियार, सुशील मुंदडा, सुनीता कुलकर्णी, राणी अहलुवालिया, सीमा सिंग आदी उपस्थित होते.
अभय शास्त्री म्हणाले, “मानसिक आजारांनी ग्रस्त, तणावाखाली असलेल्या लोकांसाठी सहकार्य करण्याच्या, तसेच जनजागृती करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेला हा नऊ दिवसांचा कार्यक्रम स्तुत्य आहे. हा आजार नसून, मानसिक स्थिती आहे. त्यातून आपण बरे होऊन चांगले काम करू शकतो, हा विश्वास देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
अनिल मंद्रुपकर म्हणाले, “समाजातील प्रत्येक घटकाने मानसिक आजारांबाबत जागृती करण्यात सहभाग घ्यायला हवा. एकमेकांना पाठिंबा देऊन, त्यातून मानसिक आजाराने ग्रस्त बांधवाना आपण बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत. व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी असे जागृतीपर उपक्रम सातत्याने राबवले जाणार आहेत.”
रामेश्वर मणियार म्हणाले, “समाजात मानसिक आरोग्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या जीवनात मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. व्यसन व आयुष्याची होणारी हेळसांड चिंतेचा विषय आहे. भविष्यात उद्भवणारा धोका टाळण्यासाठी मानसिक आजारांबाबत जनजागृती आवश्यक आहे.”
आकाश अंबादे म्हणाले, “बदलत्या जीवनशैलीमुळे बरेच लोक तणाव आणि चिंतेत असतात. सततची धावपळ, कामाचा ताण, अपुरी झोप, या सर्व गोष्टींमुळे नैराश्य, भावनिक अस्थिरता आणि चिडचिडेपणा यासारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे, शरीराच्या आरोग्याप्रमाणेच मनाच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्यावी आणि याला कोणताही कलंक समजू नये.”