BIG NEWS : पुण्यात ड्रग्सयुक्त ‘चॉकलेट’चा शाळकरी मुलांवर दुष्परिणाम; व्यसनाधीनतेचे वाढते संकट

BIG NEWS : पुण्यात ड्रग्सयुक्त ‘चॉकलेट’चा शाळकरी मुलांवर दुष्परिणाम; व्यसनाधीनतेचे वाढते संकट

पुणे – शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यात चिंताजनक चित्र समोर आले आहे. हडपसरमधील एका शाळेतील सहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याला अमली पदार्थांचे व्यसन लागले असून, त्याचे वर्तन धक्कादायक पातळीवर पोहोचले आहे. शाळेला दांडी मारून व्यसनासाठी त्याने घरातील भांडी विकली. आईने पैसे नाकारल्यावर त्याने झोपेत असलेल्या आईचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. जेव्हा विचारणा झाली, तेव्हा त्याला काहीच आठवत नव्हते.

हे केवळ एक उदाहरण नसून, पुण्यातील अनेक शाळांमध्ये चौथी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे ही अमली द्रव्ये ‘चॉकलेट’च्या रूपात मुलांपर्यंत पोहोचवली जात आहेत.

कसे पोहोचते ड्रग्स ‘चॉकलेट’मधून?

मुलांना व्यसनाकडे आकर्षित करण्यासाठी ‘चॉकलेट’चा वापर केला जातो. शाळेच्या आसपासच्या खाऊच्या दुकानांमध्ये ही ‘चॉकलेट’ खुलेआम विकली जात असून दुकानदारांनाही यामध्ये काय आहे, हे माहीत नसते. या ‘चॉकलेट’मध्ये कोकीन किंवा ब्राऊन शुगरसारखी अमली द्रव्ये कमी प्रमाणात मिसळलेली असतात. एकदा ही ‘चॉकलेट’ खाल्ल्यानंतर त्याची सवय लागते.

ड्रग्सच्या विळख्यात अडकलेल्या मुलांमध्ये दिसणारी लक्षणे :

  1. मुले एकलकोंडी आणि शांत स्वभावाची होतात

  2. आक्रमकपणा वाढतो – उदा. मारहाण करणे, दगडफेक

  3. मागणी पूर्ण न झाल्यास आत्महत्येची धमकी देतात

‘हायड्रोपोनिक’ गांजा म्हणजे मातीविना, पाण्यावर वाढवलेली गांजाची झाडे. अमेरिका व थायलंडमध्ये या पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. महाराष्ट्रातही अलीकडेच २१ किलो हायड्रो गांजासह दोन इंडोनेशियन नागरिकांना अटक करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही याकडे गांभीर्याने लक्ष वेधले आहे.

जानेवारी ते जुलै या कालावधीत १८७ शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. या ‘चॉकलेट्स’ना आकर्षक रंग व प्राणी, पक्षी वा वाद्यांचे आकार दिलेले असतात. ही उत्पादने जप्त करून नार्कोटिक्स विभागाकडे सुपूर्त करण्यात येत आहेत.

आज पालक आणि मुलांमध्ये संवादाचा अभाव मोठ्या प्रमाणावर दिसतो. मुले जर एकलकोंडी, चिडचिडी, अथवा आक्रमक वर्तन करत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष न करता वेळेवर समुपदेशन घेणे आवश्यक आहे. मुलांनी घरी आल्यावर पालकांनी मोबाइल दूर ठेवून त्यांच्याशी संवाद साधावा, असे आवाहन डॉ. भोई यांनी केले आहे.

शहरातील शाळांमध्ये ‘ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट’ आणि ‘ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निर्धार’ (इयत्ता ५वी ते ७वी) आणि ‘संयम’ (इयत्ता ८वी ते १०वी) हे उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये जाऊन मुलांशी संवाद साधून व्यसनमुक्तीसाठी समुपदेशन केले जाते, अशी माहिती प्रकल्प प्रमुख सुजाता होनप यांनी दिली.

पुण्यासारख्या शैक्षणिक शहरात मुलांना ड्रग्सपासून दूर ठेवण्यासाठी पालक, शाळा व समाजाला एकत्र येऊन काम करणे अत्यावश्यक झाले आहे. संवाद, जागृती आणि सतर्कता हाच या संकटाचा खरा उपाय आहे.