महाराष्ट्र सरकार आता खासगी कंपन्यांच्या अॅप आधारित प्रवासी वाहन सेवेवर मर्यादा न ठेवता स्वतःची सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. राज्यातील मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी परिवहन विभागाच्या सहकार्याने अॅप आधारित रिक्षा, टॅक्सी आणि ई-बाईक सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सेवेचं नाव ‘जय महाराष्ट्र’, ‘महा-राईड’, ‘महा-यात्री’ किंवा ‘महा-गो’ यापैकी काही असू शकतं, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
Pune Rave Party Case : पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी मोठी अपडेट
या शासकीय अॅपला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर लवकरच कार्यान्वित करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या अॅपच्या विकासासाठी ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी’ (MITT), ‘मित्र’ संस्था आणि काही खासगी तंत्रज्ञान कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. यंत्रणेत पारदर्शकता ठेवण्यासाठी सर्व आवश्यक बाबींचा समावेश केला जाणार आहे आणि लवकरच अॅप तयार होणार आहे.
या माध्यमातून राज्यातील मराठी युवक-युवतींना आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, वाहन खरेदीसाठी मुंबई बँक 10 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली.
तसेच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटके विमुक्त महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि एमएसडीसी या संस्थांतर्फे 11 टक्के व्याज परतावा अनुदान स्वरूपात दिला जाईल, ज्यामुळे हे कर्ज जवळपास बिनव्याजी ठरणार आहे.
गणेशोत्सवासाठी खास रेल्वे व्यवस्था! २५० विशेष गाड्यांची घोषणा; आरक्षण सुरू
केंद्र सरकारच्या अॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्वांनुसार या शासकीय अॅपसाठी नियमावली अंतिम टप्प्यात आहे. सध्या अनेक खाजगी अॅप कंपन्या चालक आणि प्रवाशांकडून भरमसाट पैसे वसूल करत आहेत. मात्र शासनाकडे आवश्यक तंत्रज्ञान, मनुष्यबळ आणि व्यवस्था असल्याने हे शासकीय अॅप सुरू झाल्यास प्रवासी आणि चालक दोघांनाही त्याचा मोठा फायदा होईल.
या अॅपला अंतिम स्वरूप देण्यासाठी 5 ऑगस्ट रोजी मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर, संबंधित तंत्रज्ञ आणि शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची अधिकृत माहिती देत या उपक्रमामुळे राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना मोठा आधार मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.