‘स्वामी २’ भक्तिगीत ३० जुलैला येणार भक्तांच्या भेटीला

पिंपरी/पुणे: ‘स्वामी’ या भक्तिगीताला प्रेक्षकांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर ‘स्वामी २’ हा पुढील भाग स्वामीभक्त प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या अफाट प्रेमामुळे भैरवा फिल्म्स प्रस्तुत ‘स्वामी’च्या पुढील अध्यायाचा शुभारंभ येत्या बुधवारी (ता. ३० जुलै) होणार आहे. किवळे येथील एमडीएस बँक्वेट्स अँड लॉन्स येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात ‘स्वामी २’ या भक्तिगीतांचे लोकार्पण केले जाणार आहे.

या भक्तीगीतात प्रशांत गवळी यांचा प्रभावी अभिनय असून, संगीत व दिग्दर्शन ब्रहम्मा यांचे आहे. भैरवा फिल्मने या गीताची निर्मिती केली असून, हर्षवर्धन वावरे यांनी स्वरबद्ध केले आहे. गीताचे बोल नरहर राहेरकर व ब्रहम्मा यांचे आहेत. दिलीप गांगुर्डे यांनी छायाचित्रण केले आहे.‘स्वामी’ या गीतामुळे लोकांच्या मनात भक्ती, श्रद्धा आणि संस्कृती यांचे पुन्हा एकदा जागरण झाले आहे. ‘स्वामी २’ हा त्या प्रवासाचा पुढील अध्याय ठरणार आहे. आपल्या प्रत्येक सुखदुःखात स्वामी आपल्या पाठीशी आहेत, याची अनुभूती या गीतातून येणार असल्याची भावना प्रशांत गवळी यांनी व्यक्त केली.