Raja Raghuvanshi Murder Case : मंगळसूत्रामुळे सोनमचा पर्दाफाश, राजाला संपवताच तिने थेट…

Raja Raghuvanshi Murder Case  : राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना शिलाँग न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर सोनम रघुवंशी आणि इतर चार आरोपींना शिलाँग सदर पोलिस स्टेशनच्या वेगवेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले आहेत. या मर्डर केसमध्ये रोज नवनवे खुलासे होतानाही दिसत आहेत. या घटनेच्या सुरूवातीस हे अपहरणाचे प्रकरण आहे, मिसिंग केस आहे की मर्डरची केस, हे शिलाँग पोलिसांना माहीतच नव्हतं. पण तपास करत असतानाच पोलिसांच्या हातात एक मोठा सुगावा लागला आणि राजाचा मृत्यू म्हणजे हत्याच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी मारेकऱ्याचा कसून शोध सुरू केला. खरं तर, 2 जून रोजी पोलिसांना वायजे डोंगमध्ये राजाचा मृतदेह सापडला. घटनास्थळी पोहोचल्यावर शिलाँग पोलिसांना वाटले की हा अपघात असू शकतो, परंतु राजाची पत्नी सोनम देखील बेपत्ता होती.

त्यानंतर शिलाँग पोलिस चौकशी करत करत सोनम रहात असलेल्या शिप्रा स्टे होम येथे पोहोचले असता, त्यांना तेथे सोनमची बॅग सापडली. पोलिसांनी बॅगची झडती घेऊन तपसणी केली असता पोलिसांना त्यात सोनमचे मंगळसूत्र सापडलं. ते पाहून पोलिस चक्रावलेच, एखादी नवविवाहित महिला मंगळसूत्राशिवाय कशी राहू शकते ? असा प्रश्न त्यांना पडला. लग्नात राजाने घातलेलं मंगळसूत्र सोनमने गळ्यात न घालता सूटकेसमध्ये का ठेवलं ? असा सवाल सर्वांच्याच मनात होता. हीच बाब पोलिसांना खटकली आणि त्यांच्या संशयाची सुई गायब असलेल्या सोनमवर गेली.

सोनमने राजाची हत्या केली असावी आणि नंतर ती फरार झाली असावी असा संशय पोलिसांना आला. तिच्यावर संशय येण्याचे आणखी एक कारण म्हणजे हत्येत वापरलेले शस्त्र. हत्येनंतर दुसऱ्या दिवशी, पोलिसांना मृतदेह सापडलेल्या ठिकाणाजवळ हत्येसाठी वापरलेलं शस्त्रही सापडलं. त्यामुळेच राजाचा मृत्यू म्हणजे अपघात नव्हे तर एक प्लॅन्ड मर्डर असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांना सोनमवरच संशय येण्याचं तिसरं कारण म्हणजे हनीमूनला येऊनही सोनमने सोशल मीडियावर एकही कपल फोटो अपलोड केला नव्हता, त्यामुळे त्यांचा संशय आणखीनच बळावला.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनिमूनसाठी जाणारं जोडपं बऱ्याचवेळा दररोज सोशल मीडियावर त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करतात, परंतु सोनमने हनिमूनसाठी घर सोडल्यानंतर तीन दिवसांपर्यंत सोशल मीडियावर कोणताही व्हिडिओ किंवा फोटो अपलोड केला नव्हता. पोलिसांना सोनमवर अधिक संशय आला आणि त्यांनी तिचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा त्यांना राजचा नंबर सापडला.

त्यानंतर पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असताना, त्यांना हत्येच्या ठिकाणापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर सोनम आणि कॉन्ट्रॅक्ट किलरचे सीसीटीव्ही फुटेज आढळले. त्यामुळे या हत्येमागे दुसरं-तिसरं कोणी नसून राजाची पत्नी सोनमच आहे, याची पोलिसांना खात्री पटली. पोलिसांच्या सांगण्यानुसार, हत्येच्या ठिकाणापासून 10 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर, सोनम टॅक्सी किंवा कारने पुढे गेली आणि ते कॉन्ट्रॅक्ट किलर देखील तेथून वेगवेगळ्या मार्गांनी निघून गेले.

या हत्याकांडाप्रकरणी मेघालय पोलिसांनी सोनम आणि राजसह 5 आरोपींना अटक केली. त्यांना शिलाँगला आणण्यात आले आहे. सर्व आरोपींना काल (11 जून) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालसमोर हजर झाल्यानंतर शिलाँग पोलिसांनी न्यायालयाकडून त्यांचा रिमांड मागितला, त्यानंतर न्यायालयाने सोनमसह सर्व आरोपींना8दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले. आता पोलिस त्यांची चौकशी करतील.