कोर्टातून सुनेविरुद्ध सोडचिठ्ठी मिळवून देण्याचे आमिष; शेतकऱ्याची सुमारे ६ लाखांची फसवणूक, बनावट महिला वकिलाला अटक

By: Editor_Pratik

On: Thursday, May 29, 2025 11:28 AM

arrest
Google News
Follow Us

लोणी काळभोर (पुणे) – एका वयोवृद्ध शेतकऱ्याला सुनेविरोधात कोर्टातून सोडचिठ्ठी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ५ लाख ९४ हजार ६० रुपये उकळणाऱ्या बोगस महिला वकिलाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (२८ मे) दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली.

अटक केलेल्या महिलेचे नाव स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२, रा. लोणी काळभोर, ता. हवेली, पुणे) असे आहे. याप्रकरणी कडु बाबुराव सातपुते (वय ६३, रा. दहिगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कडु सातपुते हे आपल्या कुटुंबासोबत दहिगावमध्ये शेती करत जगतात. त्यांच्या मुलगा व सून यांच्यात सतत वाद होत असल्याने, सुनेपासून मुलाची सोडचिठ्ठी घ्यावी असे त्यांना वाटत होते. याच संधीचा गैरफायदा घेत स्नेहल कांबळे हिने स्वतःला वकील असल्याचे भासवून सातपुते यांना फसवले.

तिने कोर्टातून सोडचिठ्ठी मिळवून देण्याचे आमिष दाखवून सातपुते यांच्याकडून रोख आणि बँकेद्वारे वेळोवेळी पैसे घेतले. एवढेच नाही तर, तिने सांगितले की त्यांच्या सुनेने बलात्कार व मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून महिला आयोगातही तक्रार दाखल आहे. अटक टाळण्यासाठी पोलीस व कोर्ट कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून सातपुते यांना सातत्याने अटकेची भीती दाखवली.

२४ एप्रिल २०२५ ते २८ मे २०२५ या कालावधीत ही फसवणूक सुरू होती. याप्रकरणी सातपुते यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सापळा रचून लोणी काळभोर ग्रामपंचायतीजवळ स्नेहल कांबळे ही १५ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडली.

या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पो. उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, पुजा माळी, हवालदार ज्योती नवले, अजिंक्य जोजारे, मंगेश नानापुरे, संदीप धुमाळ व त्यांच्या टीमने केली.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now