शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा हिंदु धर्मात विधीवत पुनर्प्रवेश!

By: Editor _2

On: Sunday, August 2, 2026 4:19 PM

Google News
Follow Us
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! – श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा आदर्श दिला. आजही फसवणूक, प्रलोभने आणि ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून होत असलेल्या धर्मांतरांना रोखण्यासाठी समाजाने संघटित झाले पाहिजे. आपण केवळ इतिहास वाचणारे नव्हे, तर इतिहास घडवणारे मावळे व्हायला हवे. ‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकार करण्याचा संकल्प प्रत्येक हिंदूने केला पाहिजे, असे प्रखर आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले.
राष्ट्रीय शुद्धीकरण दिनानिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुराष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने अशोक चौक येथील लोटस मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यंदा हिंदवी स्वराज्याचे दुसरे सरसेनापती नेताजी पालकर यांच्या शुद्धीकरणाला (घरवापसीला) तिथीनुसार ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून सोलापुरात हिंदु धर्म सोडून अन्य धर्मात गेलेल्या ५ जणांनी स्वेच्छेने आणि विधीवत हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. तसेच या दिवसाला ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ म्हणून साजरा करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने समस्त हिंदु समाजाला केले.
या वेळी श्री. घनवट पुढे म्हणाले की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी अमानुष छळ सोसून बलिदान दिले, परंतु परधर्म स्वीकारला नाही. तोच बाणा प्रत्येक हिंदूने अंगीकारला पाहिजे. तसेच धर्मांतरित हिंदूंना पुन्हा स्वधर्मात सन्मानाने घेण्यासाठी आपली दारे सदैव खुली राहिली पाहिजेत, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
हिंदुराष्ट्र सेनेचे श्री. रवी गोणे यांनी आपले अनुभव कथन करताना सांगितले की, धर्मांतरित हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रबोधनाला समाजातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आजही अनेक धर्मांतरित व्यक्तींना पुन्हा हिंदु धर्मात परतण्याची इच्छा असून त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना सन्मानाने स्वधर्मात आणण्यासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करायला हवेत.
सामाजिक विश्लेषक तथा लेखापरीक्षक श्री. सर्वेश मेंहदळे यांनी म्हटले की, मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या धर्मांतरामुळे अनेक भागांतील हिंदू बहुसंख्यांक समाज आज दुर्दैवाने अल्पसंख्यांक होत चालला आहे. हा प्रकार केवळ धार्मिक नसून राष्ट्र आणि धर्माच्या अस्तित्वावर झालेला एक अत्यंत गंभीर आघात आहे. या आव्हानाला रोखण्यासाठी हिंदू समाजाने आता अधिक सजग, संघटित आणि सक्रिय होणे ही काळाची गरज आहे.
या कार्यक्रमात श्रीक्षेत्र तुळजापूरचे महंत मावजीनाथ महाराज म्हणाले, ‘‘स्वतःच्या धर्मामध्ये मृत्यू आला तरी तो कल्याणकारी आहे; परंतु परधर्मात गेल्यास ते जीवनासाठी घातक आहे, असे भगवद्गीतेमध्ये वर्णन केले आहे. हिंदु धर्मामध्ये मोक्षाची आणि मुक्तीची संकल्पना आहे. केवळ याच धर्मात मुक्ती मिळू शकते. त्यामुळे हिंदूंनी आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व जाणून घेऊन धर्मांतरित होणाऱ्यांचे प्रबोधन करावे आणि त्यांना स्वधर्मातच ठेवण्याचा प्रयत्न करावा.’’ या वेळी प्रज्ञापुरी ज्ञानपीठाचे पीठासीन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
‘भगवा-ए-हिंद’चा संकल्प! : कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणेने धर्मरक्षणासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. परधर्मात गेलेला प्रत्येक हिंदु स्वधर्मात सन्मानाने परत येईपर्यंत जागृती, संघटन आणि शुद्धीकरणाचे कार्य अधिक वेगाने पुढे नेण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 2, 2026

August 2, 2026

July 31, 2026

July 31, 2026

July 27, 2026

July 27, 2026