नशेच्या वादातून मित्राचा खून; आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर!

By: Editor_Manas

On: Sunday, October 4, 2026 4:20 PM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस : भवानी पेठेतील काशेवाडी परिसरात नशा करताना झालेल्या वादातून मित्राचा खून झाल्याची घटना घडली. आकाश उर्फ अक्क्या उर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे (वय ३०) याचा सिमेंटच्या गट्टूने डोक्यात प्रहार करून खून केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अजय उर्फ ‘चोर राजा’ सुखदेव शिंदे (वय ३०) याला खडक पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२ ऑक्टोबर) सायंकाळी आकाश हा काशेवाडीतील आपल्या घरी होता. त्याचे मित्र शंभू आणि अबिद त्याला भेटण्यासाठी आले. त्यानंतर आकाश त्यांच्यासोबत घराबाहेर गेला.

दरम्यान, रात्री साडेआठच्या सुमारास काशेवाडीतील वजनकाट्याजवळील एका सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर आकाश गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय तपासणीत त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेनंतर आकाशची वहिनी रुपाली प्रमोद पाटोळे खडक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या. त्याचवेळी आकाशचा मित्र अजय शिंदे स्वतःहून पोलीस ठाण्यात आला. नशा करताना आकाशसोबत वाद झाल्याचे आणि त्यातून त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारल्याचे त्याने पोलिसांना सांगितल्याचे समोर आले आहे.

घटनेनंतर आरोपी घरी गेला, कपडे बदलले आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात हजर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव करीत आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now