प्रतिनिधी – मानस : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात मद्यप्राशन केल्यानंतर झालेल्या वादातून एका तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, घटनेमागील नेमके कारण तपासले जात आहे.
मृत तरुणाचे नाव राजकुमार संगोडे असे आहे. तर संशयिताचे नाव तुषार वाल्हेकर असून, दोघेही एकमेकांच्या परिचयाचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गोकुळनगर येथील एका हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत दोघे थांबले होते. दोघांनी मद्यप्राशन केल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. हा वाद वाढत जाऊन मारामारी झाली. त्यावेळी तुषार वाल्हेकर याने राजकुमारच्या डोक्यात दगडाने प्रहार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गंभीर दुखापतीमुळे राजकुमारचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी तुषार वाल्हेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वादाचे नेमके कारण आणि खुनामागील परिस्थितीचा तपास सुरू आहे.





