संघर्षातून उभे राहत आहे राहुल गांधी यांचे नेतृत्व : गोपाळदादा तिवारी

By: Editor_Manas

On: Monday, June 22, 2026 3:59 PM

Google News
Follow Us

पुणे, जून : संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि राज्य विद्यार्थी काँग्रेसच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या वतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचा समारोप उत्साहात झाला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर भाष्य केले.

बाळासाहेब ठाकरे कला दालन येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात राहुल गांधी यांच्या जीवनातील विविध पैलू, देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील महत्त्वपूर्ण क्षण छायाचित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आले होते.

यावेळी बोलताना गोपाळदादा तिवारी म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात विविध सत्तांमध्ये विभागलेला आणि परकीय राजवटीच्या अधिपत्याखाली असलेला भारत, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद, भगतसिंग, राजगुरू आणि हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व संघर्षातून स्वतंत्र आणि लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उभा राहिला. या राष्ट्रउभारणीत काँग्रेसचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

देशाच्या उभारणीतील जबाबदारीचे भान ठेवत गांधी-नेहरू कुटुंबातील नेत्यांनी लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेची संकल्पना रुजवली आणि लोकशाही संस्थांना बळकट करण्याचे कार्य केले, असेही त्यांनी नमूद केले.

राहुल गांधी यांचे नेतृत्व हे केवळ वारसाहक्कामुळे नव्हे, तर प्रतिकूल परिस्थितीत सातत्याने केलेल्या संघर्षातून उभे राहत असल्याचे तिवारी म्हणाले. देशभर केलेल्या पदयात्रांमुळे राहुल गांधी यांनी सामान्य नागरिकांच्या समस्या जवळून जाणून घेतल्या असून, त्यांच्या नेतृत्वाला जनतेचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

देशहिताला प्राधान्य देणारी विचारसरणी आणि लोकांशी थेट संवाद साधण्याची भूमिका यामुळे राहुल गांधी यांचे नेतृत्व अधिक व्यापक होत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप आणि दीप्ती चौधरी यांच्या उपस्थितीत झाले होते.

समारोप कार्यक्रमास सिद्धार्थ जांभूळकर, साहेबराव क्षीरसागर, ॲड. श्रीकांत पाटील, लक्ष्मीकांत हुंडेकर, राजेश सुतार यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 25, 2026

August 25, 2026

August 25, 2026

August 25, 2026

August 23, 2026

August 22, 2026