पुणे – खेडेगावातील आदिवासी भागात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी गांडूळ खत निर्मितीचा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. बांबूंच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या लाकडी पेट्यांमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येत असून, काही पेट्या गोलाकार, काही चौकोनी तर काही आयताकृती स्वरूपाच्या आहेत. या पेट्यांमध्ये जनावरांचे शेण, झाडांचा पालापाचोळा, पिकांचे अवशेष तसेच भाजीपाल्याचा उरलेला भाग टाकून सेंद्रिय खत तयार केले जाते.
या प्रक्रियेत गांडुळे महत्त्वाची भूमिका बजावतात. रोज या मिश्रणावर पाणी शिंपडून योग्य ओलावा राखला जातो आणि काही दिवसांतच उत्कृष्ट प्रतीचे जैविक खत तयार होते. या खताला बाजारात मोठी मागणी असून सेंद्रिय शेतीसाठी ते अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या खताच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढते, रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते आणि शेती उत्पादनात लक्षणीय वाढ होत असल्याचे शेतकरी सांगतात.
हा उपक्रम सुयश चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून राबवला जात असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह राजस्थान आणि ओडिशा राज्यांतही विस्तारला आहे. शेतकऱ्यांना कमी खर्चात सेंद्रिय खत निर्मितीचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. अशा प्रकारच्या खत निर्मितीच्या पेट्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून त्या विकत घेण्यासाठी शासनाने आर्थिक योगदान द्यावे, अशी मागणी संस्थेकडून करण्यात आली आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत घैसास, कार्याध्यक्ष स्मिता घैसास आणि शलाका घैसास यांनी ही माहिती दिली.
विशेष म्हणजे, या प्रकल्पातून तयार होणारे गांडूळ खत साधारणपणे दीड महिन्याच्या कालावधीत तयार होण्यास सुरुवात होते. त्यानंतर आठवड्याच्या अंतराने खत काढले जाते. एक शेतकरी सरासरी दीड टनांपर्यंत गांडूळ खताची निर्मिती करू शकतो. तयार झालेले खत प्रामुख्याने स्वतःच्या शेतात वापरले जाते, तर अतिरिक्त खताची विक्री करून शेतकरी पूरक उत्पन्नही मिळवतात. त्यामुळे कमी खर्चात सेंद्रिय खत निर्मितीबरोबरच ग्रामीण व आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाची नवी संधी निर्माण होत आहे.





