वसईतील ब्लाइंड मर्डर मिस्ट्रीचा उलगडा; प्रेयसीनेच प्रियकराचा केला खून, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

By: Editor_Manas

On: Friday, May 15, 2026 9:13 AM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस, ठाणे : मुंब्रा येथील एका बेपत्ता तरुणाच्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला असून, प्रेयसीनेच पती, भाऊ आणि मित्राच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याचे समोर आले आहे. खंडणीच्या पैशांसाठी आखलेल्या कटातून हा खून करण्यात आला असून, मृतदेह हिरव्या रंगाच्या ड्रममध्ये भरून वसईतील निर्जन नाल्यात फेकण्यात आल्याची माहिती पोलिस तपासातून उघड झाली आहे.

या प्रकरणी मेहजबीन खातून इकरान शेख आणि तिचा भाऊ तारीक इकरान शेख यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर मेहजबीनचा पती हसन आणि मित्र मुज्जम पठाण हे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त प्रिया डमाळे यांनी दिली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मुंब्रा परिसरातील अरबाज मकसूद अली खान हा ३ एप्रिल रोजी “दादरला पैसे घेण्यासाठी जात आहे” असे सांगून घराबाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो परतलाच नाही. बराच वेळ संपर्क न झाल्याने त्याचे वडील मकसूद अली खान यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

तपासादरम्यान पोलिस उपनिरीक्षक अंबादास सावंत यांनी अरबाजच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स आणि लोकेशन तपासले. त्यावेळी त्याचा मोबाईल वसईतील भोईदापाडा परिसरात सक्रिय असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, अरबाजची प्रेयसी मेहजबीन हिचे मोबाईल लोकेशनही त्याच परिसरात असल्याचे आढळले.

संशय बळावल्याने पोलिसांनी मेहजबीनला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या मेहजबीनने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, मेहजबीनने तिचा पती हसन, भाऊ तारीक शेख आणि मित्र मुज्जम तालीब पठाण यांच्या मदतीने अरबाजला वसई येथे बोलावले. तेथे त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्याचे हातपाय बांधून प्लास्टिकच्या पाइपने बेदम मारहाण केली. या मारहाणीत अरबाजचा मृत्यू झाला.

यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी अरबाजचा मृतदेह हिरव्या रंगाच्या ड्रममध्ये भरला आणि वालीव परिसरातील निर्जन नाल्यात फेकून दिला.

या प्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

May 15, 2026

May 15, 2026

May 15, 2026

May 15, 2026

May 15, 2026

May 15, 2026