सध्याचा काळ मानवी मूल्यांची कसोटी पाहणारा; डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

By: Editor_Manas

On: Thursday, March 26, 2026 7:24 PM

Google News
Follow Us

पुणे: “जागतिक स्तरावर निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती ही केवळ सीमारेषांपुरती मर्यादित नसून, ती मानवतेच्या मुळावर आघात करणारी आहे. हा केवळ राजकीय, सामाजिक संघर्षाचाच नाही, तर मानवी मूल्यांची कसोटी पाहणारा काळ आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

भगवान महावीर एज्युकेशन सोसायटी व सहकारी संस्थांच्या वतीने आयोजित विश्वशांती परिषदेत डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात आयोजित विश्वशांती परिषदेचे उद्घाटन सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांच्या हस्ते झाले. प्रसंगी भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, झेन मास्टर भन्ते सुदर्शन, फादर अँटोन डिसोझा, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह अंजली कुलकर्णी, मुलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार, विचारवंत सरदार पदमसिंग, प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सदाशिव कांबळे, माता रमाई प्रतिष्ठानचे विठ्ठल गायकवाड, ज्ञान फाउंडेशनचे मनोहर कोलते, सुसंगत फाउंडेशनचे डॉ. सुधाकर न्हाळदे, अभय छाजेड, राजेंद्र धोका, शैलेश पगारिया, राजेंद्र सुराणा, श्रीपाल ललवानी व प्रितम प्रकाश महाविद्यालयामधील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “युद्धाची सर्वाधिक झळ निरपराध नागरिकांनाच बसते. महिला, बालक आणि दुर्बल घटक यांचे दुःख कोणत्याही विजयापेक्षा मोठे असते. धर्म कधीही हिंसेचे समर्थन करत नाही; युद्ध हे मानवी लोभ आणि सत्ताकांक्षेचे प्रतीक आहे. आजच्या राजकारणात डोनाल्ड ट्रम्प यांसारख्या ध्रुवीकरण करणाऱ्या नेतृत्वामुळे संघर्ष तीव्र होत आहेत. दोन बलाढ्य राष्ट्रांतील संघर्षाचे परिणाम अखेरीस संपूर्ण मानवजातीला भोगावे लागतात. विज्ञान-प्रगती असूनही मानव सुरक्षित नसेल, तर त्या प्रगतीचा अर्थ काय? संवाद, सहिष्णुता आणि परस्पर आदर यांच्याद्वारेच विश्वशांती शक्य आहे.”

संजय नहार म्हणाले, “स्वामी विवेकानंद यांनी १८९३ मधील जागतिक धर्म परिषदेत ‘सर्वधर्म समभाव’ व ‘विश्वबंधुत्वा’चा संदेश दिला होता. आजच्या अस्थिर आणि संघर्षमय जागतिक परिस्थितीत त्या विचारांची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे. ‘विश्वशांती परिषद’ हा त्या परंपरेचा पुढचा टप्पा असून, भारताने ‘वसुधैव कुटुंबकम्’च्या भूमिकेतून जागतिक शांततेसाठी पुढाकार घ्यावा. हा प्रयत्न छोटा असला तरी, तो जगाला शांततेचा, सहअस्तित्वाचा आणि मानवतेचा संदेश देणारा आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे शक्य असून, विश्वशांती ही सामूहिक कृतीतून साकार होणारी जबाबदारी आहे.”

डॉ. अशोककुमार पगारिया म्हणाले, “महायुद्धाचा परिणाम केवळ लढणाऱ्या देशांपुरता मर्यादित राहत नाही, तर त्याची झळ संपूर्ण जगाला बसते. आज पेट्रोलच्या रांगा, गॅसची टंचाई यांसारख्या दैनंदिन अडचणींतून हे वास्तव जाणवते. आपला देश थेट युद्धात नसला तरी इंधन व संसाधनांसाठी परावलंबित्वामुळे जागतिक संघर्षांचे आर्थिक व सामाजिक परिणाम आपल्यावरही होतात; त्याचा परिणाम सामान्य माणसाच्या जीवनावर आणि मानसिक शांततेवर होतो. या पार्श्वभूमीवर, डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘विश्वशांती परिषद’ हा सकारात्मक आणि आवश्यक उपक्रम ठरतो.”

फादर अँटोन डिसोझा म्हणाले, “देव हा प्रकाश, आशा आणि शांततेचा स्रोत आहे. विवेकी, प्रामाणिक आणि जबाबदार नात्यांमधूनच ही शांतता प्रस्थापित होते. युद्धापेक्षा शिस्त, विचार आणि धैर्य अधिक आवश्यक असते. आज विज्ञान प्रगती करत आहे, परंतु ते प्रेम निर्माण करू शकत नाही. हिंसेचा गौरव इतका वाढला आहे की आपण तिच्या परिणामांबद्दल असंवेदनशील होत चाललो आहोत. तरीही, आपण विसरू नये की या जगात अजूनही आशेचे तेजस्वी दीप आहेत.”

झेन मास्टर भन्ते सुदर्शन म्हणाले, “संपूर्ण जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचे आज चित्र आहे. वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने जग खूप पुढे गेले असले, तरी विचारांच्या पातळीवर मोठे विभाजन दिसून येत आहे. एकीकडे सर्व देश युद्धासाठी सज्ज होत आहेत, तर दुसरीकडे त्याच देशांतील सामान्य नागरिक शांततेचीच अपेक्षा करत आहेत. त्यासाठी सर्वधर्मियांनी एकत्रित प्रयत्न करावेत.”

अंजली कुलकर्णी म्हणाल्या, “ही विश्वशांती परिषद अत्यंत योग्य आणि महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. विविध धर्मातील लोकांना एकत्र आणून समाजात शांततेचा आणि एकतेचा संदेश देण्याचा जो निर्धार या परिषदेतून केला जात आहे, तो खरोखरच कौतुकास्पद आहे. हिंदू-मुस्लिमांच्या नावाखाली संघर्ष पेटत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी मानवतेच्या आधारावर एकत्र येणे गरजेचे आहे.”

अंजुम इनामदार म्हणाले, “मानवतेचा धर्म जपणे हीच आजची खरी गरज आहे. मानवता हाच खरा धर्म आहे. आपण कोणत्याही धर्माचे असलो तरी त्या मानवतेच्या धर्माला पुढे नेणे, जपणे आणि आचरणात आणणे ही आपली जबाबदारी आहे. मानवता, परस्पर आदरभाव आणि शांततेचे महत्त्व आपण समजून घ्यावे. विविध धर्म, पंथ आणि संस्कृती असूनही, मानवतेच्या मार्गानेच विश्वशांती साध्य होऊ शकते, हे ध्यानात घ्यावे. 

प्रा. विभा ब्राह्मणकर यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य कांबळे सदाशिव यांनी स्वागत केले. लता ललवानी यांनी ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ या साने गुरुजींच्या गीताने शुभारंभ केला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 26, 2026

March 26, 2026

March 26, 2026

Prime-Minister-Narendra-Modi-3

March 26, 2026

March 25, 2026

March 25, 2026