जागतिक बायपोलर दिनानिमित्त त्यांनी त्यांच्या पती विरेन यांच्या अनुभवातून या आजाराचे वास्तव मांडले. विरेन हे यशस्वी आणि कर्तृत्ववान व्यावसायिक असले, तरी त्यांच्या आयुष्यात मन:स्थितीचे टोकाचे बदल होत असत. ‘मॅनिया’च्या अवस्थेत त्यांच्यात प्रचंड ऊर्जा निर्माण होऊन ते सलग अनेक तास न झोपता काम करत, वेगाने बोलत आणि जोखमीचे निर्णय घेत असत. मात्र काही काळानंतर ‘डिप्रेशन’च्या टप्प्यात ते पूर्णपणे खचून जात, अंथरुणातून उठण्याची इच्छाही होत नसे आणि नकारात्मक विचारांनी ग्रासले जात, असे त्यांनी सांगितले.
मीना राजपूत म्हणाल्या, “हा त्रास बायपोलर मूड डिसॉर्डरमुळे होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली. औषधोपचार, समुपदेशन आणि स्व-मदत गटाच्या सहाय्याने गेली दहा वर्षे त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते गेली १८ वर्षे ‘कनेक्टिंग ट्रस्ट’मध्ये स्वयंसेवक म्हणून कार्यरत असून या कामातून त्यांना मानसिक समाधान मिळते. याच अनुभवातून ‘समतोल बायपोलर मूड डिसॉर्डर आधार गट, पुणे’ची स्थापना करण्यात आली आहे. ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके आणि डॉ. विद्याधर वाटवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू असून डॉ. सुजलाताई वाटवे गटाला मार्गदर्शन करतात.”
बायपोलर डिसॉर्डरमध्ये मॅनिया आणि डिप्रेशन अशा दोन टोकांच्या अवस्था दिसतात. मेंदूतील रसायनांचे असंतुलन, अनुवांशिकता आणि तणाव ही त्यामागील प्रमुख कारणे असू शकतात. या आजाराकडे ‘वेडेपणा’ म्हणून न पाहता सहानुभूती आणि उपचारांची गरज म्हणून पाहणे आवश्यक आहे, असेही राजपूत यांनी नमूद केले.





