नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या केरळ लघुपट महोत्सवात मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब घडली आहे. ‘अत्तर’ या लघुपटासाठी रामकुमार शेडगे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला, तर त्याच लघुपटातील बालकलाकार मीरा शेडगे यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा बहुमान प्राप्त झाला.
यतीन कार्येकर म्हणाले, “‘अत्तर’ ही कलाकृती काळजाला हात घालणारी असून मुलीच्या संघर्षाची कहाणी पडद्यावर पाहताना प्रेक्षकांना प्रेरणा देते.” पुढे ते म्हणाले “रामकुमार हे अत्यंत संवेदनशील आणि अभ्यासू दिग्दर्शक आहेत. कथेला वास्तवाशी जोडून ती प्रभावीपणे पडद्यावर मांडण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. कलाकारांकडून उत्कृष्ट अभिनय करून घेण्याची त्यांची शैली खास आहे. या अगोदर देखील त्यांनी दर्जेदार कलाकृतींची निर्मिती केली आहे.

रामकुमार शेडगे म्हणाले की “ या महोत्सवात उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार आणि उत्कृष्ट बालकलाकार हे अत्यंत महत्वाचे पुरस्कार मिळाले. याचा मोठा आनंद आहे. “हा पुरस्कार माझ्यासाठीच नाही, तर संपूर्ण टीमच्या मेहनतीचं फळ आहे. ‘अत्तर’ सारखा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही मनापासून काम केलं आहे. आगामी काळात आमच्या दर्जेदार कलाकृती लवकर रसिकांच्या भेटीला येणार आहेत.
या महोत्सवात ‘अनौरस’ हा मराठी लघुपट सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला, तर ‘अ नेम’ या लघुपटासाठी अनुप जॉर्ज यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार देण्यात आला.
प्रसिद्ध अभिनेते नितीन कार्यकर आणि ज्येष्ठ लेखक-पत्रकार सुभाषचंद्र जाधव यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. या महोत्सवात भारतासह देश-विदेशातील 50 हून अधिक लघुपट प्रदर्शित झाले होते, त्यापैकी सुमारे 30 लघुपटांना विविध विभागांमध्ये गौरविण्यात आले. अशी माहिती महोत्सवाचे आयोजक योगेश बारस्कर यांनी दिली.





