‘तेजस्वी’ मधून सावरकरांची स्फूर्तिदायी गाथा; पुणेकरांना दृकश्राव्य अनुभव

By: Editor_Manas

On: Tuesday, March 3, 2026 4:50 PM

Google News
Follow Us

पुणे: पडद्यावर दिसणारी दुर्मिळ छायाचित्रे, त्याला पूरक निवेदन, अजरामर रचना आणि कथनातून साकारलेल्या ‘तेजस्वी’ या कार्यक्रमात पुणेकरांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्फूर्तिदायी गाथेची दृकश्राव्य अनुभूती मिळाली. ‘जय देव जय देव जय शिवराया’, ‘सागरा प्राण तळमळला’, ‘हे हिंदू नृसिंहा’ अशा अजरामर गीतांनी उपस्थितांना भावविवश केले.

निमित्त होते, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त वंचित विकास संस्थेतर्फे आयोजित ‘तेजस्वी’ या सांगीतिक कार्यक्रमाचे! टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सावरकरांच्या अष्टपैलू जीवनाचा पट उलगडत गेला. प्रखर राष्ट्रभक्त, क्रांतिकारकांचे मुकुटमणी, प्रतिभावान लेखक, संवेदनशील कवी, विद्वान व्याख्याते, उत्कृष्ट नाटककार, कठोर विज्ञाननिष्ठ, भाषाप्रेमी, समाजसुधारक, हिंदू संघटनासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवणारे कृतिशील हिंदुत्ववादी असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विविध पैलू समोर आले.

राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. संस्थेच्या वतीने त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाची निर्मिती, संकल्पना आणि लेखन सुधांशु नाईक यांनी केले होते. प्रसाद नातू, आरती परांजपे, चैत्राली अभ्यंकर आणि स्वतः सुधांशु नाईक यांचे ओघवते सादरीकरण मंत्रमुग्ध करणारे होते. व्हायोलिनवर गोविंद कुलकर्णी यांनी साथसंगत केली. तंत्र सहाय्य अक्षय वाटवे यांनी सांभाळले.

अंदमान ते भगूर – संघर्षाचा प्रवास, सेल्युलर जेल येथील सावरकरांचा कठोर कारावास, अंदमानचे लष्करीदृष्ट्या महत्त्व आणि भगूर येथील सावरकर वाडा या जन्मस्थानाचा उल्लेख करण्यात आला. सावरकरांच्या जीवनातील विविध टप्पे प्रभावी निवेदनातून उलगडले. लंडनला शिक्षणासाठी गेलेल्या सावरकरांचा आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांचा परिचय, तसेच ते राहत असलेले इंडिया हाऊस याचा इतिहास कथन करण्यात आला. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरावरील हस्तलिखित आणि जोसेफ मॅझिनी यांच्या चरित्राचा प्रभाव यावरही प्रकाश टाकण्यात आला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, ‘काळ’चे शिवरामपंत परांजपे आणि विदेशी कपड्यांच्या पहिल्या होळीचा प्रसंग यांचे स्मरण करून स्वदेशी आंदोलनाची पार्श्वभूमी मांडण्यात आली.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026