पुणे | प्रतिनिधी – मानस : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथील जिल्हा परिषद शाळेत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. गणिताच्या प्रश्नाचे उत्तर चुकल्याच्या कारणावरून इयत्ता सातवीतील तब्बल १५ विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वर्गातच झाली मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी गणिताचा तास सुरू असताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काही उदाहरणे सोडवायला दिली. ज्या विद्यार्थ्यांची उत्तरे चुकीची आली, त्यांना शिक्षा देण्यासाठी वर्गातील मॉनिटरकडूनच काठीने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत अनेक विद्यार्थ्यांच्या अंगावर वळ उठले असून काहींना दुखापतही झाली आहे.
शिक्षकांच्या भूमिकेवर प्रश्न
या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे ही मारहाण शिक्षकांच्या उपस्थितीत झाल्याचा आरोप आहे. शिक्षकांनी स्वतः कारवाई न करता मॉनिटरला विद्यार्थ्यांना मारण्यास सांगितल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे शाळा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पालकांचा संताप, पोलीस तक्रार
शाळा सुटल्यानंतर मुलांच्या अंगावरच्या जखमा पाहून पालकांनी शाळेत धाव घेतली. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त पालकांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
शिक्षण विभागाची चौकशी सुरू
घटनेची गंभीर दखल घेत शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांनी शाळेला भेट देत चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात संबंधित शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शारीरिक शिक्षेला कायद्याने बंदी
आरटीई (RTE) कायद्यानुसार शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा देण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही विद्यार्थ्यांकडूनच विद्यार्थ्यांना मारहाण करवून घेणे हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे.





