पुणे : संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या आणि पुढील काळात किमान एक हजार वर्षे टिकून राहिल अशा पद्धतीने श्री रामजन्मभूमी मंदिराची बांधणी करण्यात आली आहे. हे मंदिर व त्याच्या परिसरासाठी नियोजित केलेल्या सहा टप्प्यांचे काम पूर्णत्वाला गेले असून उर्वरित सातव्या टप्प्याचे काम पुढील एक वर्षात पूर्ण होत आहे, अशी महिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे प्रकल्प निर्माण अधिकारी असणारे पुणेकर अभियंते जगदीश आफळे यांनी दिली.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) प्राध्यापक आणि विद्यार्थिनींनी भरगच्च भरलेल्या सभागृसहात आफळे यांनी या सादरीकरणाची ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, भौगोलिक आणि स्थापत्य शास्त्र्याच्या दृष्टिकोनामधून ही माहिती सांगितली. यावेळी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य श्री. पारखी उपस्थित होते.
बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप यांनी आफळे यांचा सत्कार करताना त्यांच्या अनुभवाचा लाभ घेण्यासाठी त्यांना प्राध्यापक एमिरेटस (सन्मान्य निमंत्रिक अध्यापक) म्हणून भविष्यात या प्रकल्पाची तांत्रिक माहिती देण्यासाठीही आमंत्रित केले. ते म्हणाले की, पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनियरींग (सीओईपी) मधून स्थापत्य अभियंत्याची पदवी घेतलेले आफळे यांची निवड 2019 मध्ये न्यायालयाचा निकाल श्रीराम जन्मभूमी विषयाच्या बाजूने लागल्यावर झाली. तेथपासून या पवित्र स्थळाच्या उभारणीचा सर्व प्रवास आफळे यांच्या सक्रिय सहभागातून झाला आहे.
श्रीराम जन्मभूमी मंदीर आणि परिसरासंबंधी आजवर झालेल्या कामासंबंधी सादरीकरण करण्यापूर्वी आफळे यांनी आयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी गेल्या पाच शतकांच्या लढ्याची विस्तृत माहिती सांगितली. ते म्हणाले की, सुरुवातीला मंदिराच्या गर्भगृहाला लागून असणाऱ्या ग्रहमंडप, रंगमंडप आणि नृत्यमंडप तसेच सिंहद्वाराच्या कामचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यामध्ये वेळोवेळी उंची व रुंदीमध्ये बदल करताना भक्कम पायाभरणी करण्यापूर्वी जगभरातील महत्वाच्या प्राचीन वास्तूंना भेट देऊन त्याचा वास्तूरचनाशास्त्राच्या व त्यामागील टिकाऊपणामागील कारणे शोधणारा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यात आला. आधीच्या अंदाजानुसार या मंदिर उभारणीसाठी ४५० कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चातही पुढे दुप्पट वाढ होत गेली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तो खर्च सरकारने करायचा नसल्याने तो संपूर्ण लोकवर्गणीतूनच जमा करण्याचे ठरवण्यात आले.
आफळे पुढे म्हणाले की, भक्कम पाया व वरचे दगडी बांधकामाचे वजन तोलून धरण्याची क्षमता (लोड बेअरिंग) असणारे बांधकामासाठी रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रिट (आरसीसी) तंत्रज्ञानाचा व ग्रॅनाईटच्या दगडाचा वापर करण्याचे ठरवण्यात आले. मंदिरासाठी पाया खणताना खाली बाराव्या शतकात राजा मेघसेतूने बांधलेले तसेच त्यापूर्वी सातव्या शतकातील राजा स्कंदगुप्तने साकारलेले राम मंदिराचे अवशेष सापडले. त्याआधीचे म्हणजे इसवीसनपूर्व पहिल्या शतकातील राजा विक्रमादित्याच्या काळातील व त्याही आधीच्या इसवी सनपूर्व चौथ्या-पाचव्या शतकात असणाऱ्या मौर्य काळातील मंदिराचे अवशेषही मिळाले. तिथे सापडलेल्या संस्कृत व पालीमधील शिलालेखावरून ते आधी राममंदिर होते हेच निष्पन्न झाले. सुरक्षेचा भाग म्हणून शेजारून वाहणाऱ्या शरयू नदीच्या पुराचा भविष्यातील धोका ओळखून खोलवर पाया खणलेली रुंदीला जाड सीमा भिंतही बांधण्यात आली.
प्रत्यक्ष मंदिर व परिसर उभारणीसाठी मंदिरासाठी मिळून ७० एकर जागेत भव्य बांधकाम करण्याचे निश्चित झाले.त्यासाठी स्वच्छतागृहे, त्यासाठी लागणारे पाणी, सांडपाणी निचरा व्यवस्था, मंदिर बांधकाम करण्यासाठी लागणारा १०० फूट रुंदीचा रस्ता (कॅरिडॉर) सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) तयार करण्यात आला. प्रत्यक्ष मंदिर बांधकाम २१ जानेवारी २०२१ पासून सुरु झाले असून फेब्रूवारी २०२६ पर्यंत उत्तरेकडील ३५ एकरवरील बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित बांधकामामध्ये दोन मोठी सभागृहे, एक वस्तूसंग्रहालय आणि तीन वास्तूंची उभारणी बाकी आहे ती एक वर्षामध्ये पूर्ण होईल, असे आफळे यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, सहा वर्षाच्या रामलल्ला कसा दिसत असेल यासाठी काळा पाषाण दगडाच्या मूर्तीकाम करण्यापूर्वी प्रसिद्ध मूर्तीतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर आणि चित्रकार वासूदेव कामत यांची मदत घेण्यात आली. तर मंदिर पसिरातील मूर्तींसाठी मार्बल दगड निवडण्यात आला. या भागातील मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या राजस्थानी व दाक्षिणात्य दगड, फ्लाय ॲश व विटांचा वापर करण्यात आला. तसेच दुसऱ्या मजल्यावर वजनाने हलका पण टिकाऊ असणाऱ्या टायटेनियम धातूच्या जाळ्या लावण्यात आल्या आहेत. याशिवाय मंदिराभोवतीचे पंचायतन, मंदिराचा रस्ता, वाल्मिकी रामायणातील वारली कला पद्धतीची छापाची त्रिमिती आकारातील शिल्पे, रामायणपूर्व क्रौंच वधाचे दृश्य ही कामे प्रगतीपथावर आहेत. रामायणातील जटायू पक्षी, तसेच हातात दगड धरलेल्या खारूताईचे शिल्प हे मंदिरासाठी काम करणाऱ्या सामान्य कामगारांच्या कामाचे प्रतिक आहे. श्रीराम मंदिरासाठी गेल्या 450 वर्षांमध्ये दिलेल्या बलिदानाचे प्रतीक असणाऱ्या स्मृती स्तंभाचे कामही चालू आहे.
रामसेतू उभारणीतील आपण एक वानर!
आफळे म्हणाले की, श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आदरातिथ्य करण्याचे यजमानपद मिळाल्याच्या सन्मानाने कृतकृत्य झाल्यासारखे वाटले! सहा वर्षांपूर्वी या प्रकल्पात निवड झाल्यावर तिथे जाण्यापूर्वी ९५ वर्षे वयाच्या आईचे आशिर्वाद घेताना तिने म्हटलेले शब्द आठवले की, हे काम पूर्ण केल्याशिवाय परतू नकोस! एका प्रश्नाला उत्तर देताना आफळे म्हणाले की, रामायणाच्या काळात आपण कदाचित रामसेतू बांधणारा एक वानर असू!
आयोध्येतील श्रीराम मंदिर हजार वर्षे टिकणार : जगदीश आफळेांचा विश्वास
By: Editor_Manas
On: Tuesday, March 3, 2026 4:07 PM
aapka prahar, aapka prahar times, marathi news pune, mumbai pune rain, news of pune, prahaar, prahar, prahar janshakti, prahar protest pune, prahar sanghatana, prahar sanghatana news, prahar times, prahar times mumbra, protest in pune, pune, pune handicap protest, pune live news marathi, pune news, pune political news, pune prahar protest, pune protest, pune traffic news, pune traffic protest, rasta roko pune, road blockade pune, social welfare pune, stone pelting pune, unique protest pune, zilla parishad pune





