पुणे | प्रतिनिधी – मानस : परराज्यातील मटारचा हंगाम संपल्यामुळे पुणे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डात मटारच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर परिसरातून मटारची आवक सुरू झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर मात्र स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडी येथील घाऊक बाजारात रविवारी राज्यासह परराज्यातून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशातून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, राजस्थानातून ५ ते ६ टेम्पो गाजर, कर्नाटकातून ५ ते ६ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश व तामिळनाडूतून ४ ते ५ टेम्पो शेवगा, तसेच कर्नाटक व तामिळनाडूतून ५ ते ६ टेम्पो तोतापुरी कैरीची आवक झाली. याशिवाय कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो घेवडा, ३ टेम्पो पावटा, कर्नाटक व गुजरातमधून भुईमूग शेंग, तर मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो लसूण बाजारात दाखल झाल्याची माहिती ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून सातारी आलेच्या ६०० ते ७०० गोण्या, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार पेट्या, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, काकडी ८ टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, तसेच कांदा १०० ते १२५ टेम्पो अशी मोठ्या प्रमाणात आवक झाली. पारनेरहून ८ ते १० टेम्पो मटार बाजारात दाखल झाला. तसेच इंदूर, आग्रा व स्थानिक भागातून बटाट्याचे ४० ते ४५ टेम्पो आले.
पालेभाज्यांचे दर स्थिर
तरकारी विभागात सर्व प्रकारच्या पालेभाज्यांची आवक चांगली झाल्याने दर स्थिर राहिले. कोथिंबीर सुमारे १.२५ लाख जुड्या, तर मेथीच्या ५० हजार जुड्या बाजारात आल्या. कोथिंबीर, कांदापात व पालक यांचे दर ८०० ते १५०० रुपये प्रति शेकडा जुडी, मेथी, शेपू ८०० ते १२०० रुपये, तर चाकवत, करडई, पुदिना, अंबाडी आदींचे दर ३०० ते १००० रुपयांच्या दरम्यान स्थिर राहिले.
संत्र्याच्या दरात वाढ
घाऊक फळबाजारात संत्र्याच्या दरात वाढ नोंदवली गेली असून, मोसंबी, लिंबू, कलिंगड, खरबूज, पपई, अननस, चिकू, पेरू व डाळिंब यांच्या दरात स्थिरता आहे. बाजारात मोसंबी ३० ते ४० टन, संत्री २ ते ३ टन, डाळिंब १५ ते २० टन, पपई ७ ते ८ टेम्पो, लिंबे ८०० ते १००० गोण्या, कलिंगड ८० ते ९० टन, खरबूज ३० ते ३५ टन, चिकू दीड हजार गोण्या, पेरू १०० ते १२५ क्रेट्स आणि अननस ६ ट्रक इतकी आवक झाली.





