उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील अंतर कमी होण्याची गरज : विवेक गाडगीळ

By: Editor_Manas

On: Tuesday, March 17, 2026 1:06 PM

Google News
Follow Us

पुणे: “देशात आगामी काळात अभियांत्रिकीशी संबंधित पायाभूत सुविधा क्षेत्रात प्रचंड संधी आहेत, मात्र कुशल तसेच प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता, ही मोठी समस्या या क्षेत्राला भेडसावत आहे. या समस्येच्या निराकरणासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांतील अंतर कमी होण्याची गरज आहे. अभियांत्रिकी तज्ज्ञ आणि विद्यार्थी, यांच्यात सेतूनिर्मिती तसेच अभियंता न होताही, पायाभूत सुविधा निर्मितीच्या क्षेत्रात प्रशिक्षित युवा मनुष्यबळाची मोठ्या संख्येने निर्मिती, हे ध्येय बाळगणाऱ्या अभिनव अभियांत्रिकी स्थापत्त्य केंद्राचे योगदान महत्त्वपूर्ण आहे,” असे प्रतिपादन एल अँड टी मेट्रोरेलचे माजी मुख्य कार्यकारी तसेच व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ यांनी केले.

डेक्कन जिमखाना क्लबमध्ये अभिनव अभियांत्रिकी स्थापत्य केंद्र (एएएसके) आयोजित विशेष संवादसत्रात अभियांत्रिकी क्षेत्रातील अनुभवी मान्यवर अभियंते सहभागी झाले होते. विवेक गाडगीळ यांच्यासह बी. जी. शिर्के कन्स्ट्क्शन टेक्नाॅलाॅजीचे उपाध्यक्ष आर. बी. सूर्यवंशी, प्रीकास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक कपिलेश भाटे, या तज्ज्ञांनी यावेळी उद्योगविश्व आणि शैक्षणिक संस्था यांना पूरक ठरणाऱ्या अभ्यासक्रमांचे सक्षमीकरण, कौशल्य विकास, मनुष्यबळविकास आदी मुद्यांवर मांडणी केली. अभियंता मनोज देशमुख यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी ‘एएएसके’चे आजीव विश्वस्त नीलकंठ जोशी, संजय वायचळ, जयदीप राजे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अभिनव अभिययांत्रिकी स्थापत्त्य केंद्रामार्फत आरएमसी प्लांट मॅनेजमेंट (१०० दिवसांचा अभ्यासक्रम) आणि इंडस्ट्री रेडीनेस प्रोग्रॅम हे दोन नवीन त्रिस्तरीय अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले.

विवेक गाडगीळ म्हणाले, “दिवसेंदिवस बांधकामविश्वातील प्रकल्पनिर्मिती गुंतागुंतीची होत आहे. वेळ कमी आणि प्रकल्प महाकाय, असे चित्र आहे. यामध्ये समतोल साधण्यासाठी कुशल तसेच प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवणाऱ्या ‘एएएसके’सारख्या संस्थांना पाठबळ दिले पाहिजे, तरच आपण स्केल आणि स्कील, यांच्यात मेळ साधू शकतो. आपल्याकडे वारेमाप अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू केली जातात, पण उद्योगाला ज्यांची सर्वाधिक गरज आहे, असे फोरमन, डिझाईनर्स, क्वाॅलिटी कंट्रोलर्स, साईट व्यवस्थापक, मशीनरी हाताळणारे कुशल लोक मिळत नाहीत, ही शोकांतिका आहे. पूर्वी हे सर्व घटक, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे भाग होते, आता ते नसल्याने उद्योगविश्व आणि शैक्षणिक संस्था, यात अंतर वाढले आहे.”

आर. बी. सूर्यवंशी म्हणाले, “वेगाने विकसित होणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेत बांधकाम क्षेत्राचा वाटा तब्बल ८ ते १० टक्के आहे. पायाभूत सुविधांचा विकास अधिक गतीने सुरू राहणार असून, काम उपलब्ध मात्र ते उत्तम पद्धतीने करणारे कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळ कमी, असा विरोधाभास दिसत आहे. स्थापत्य अभियांत्रिकीप्रमाणेच मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अभियंत्यांचीही गरज या क्षेत्रात आहे. वाढत्या औद्योगीकरणामुळे यांत्रिक व तांत्रिक सुविधा, उपकरणांत वेगाने वाढ होत आहे, पण पारंपरिक अभ्यासक्रमांत हे विषय शिकवले जात नसल्याने अभियंत्यांनाही नव्याने प्रशिक्षित करण्याची गरज आहे.”

कपिलेश भाटे यांनी कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव, हा जागतिक प्रश्न झाल्याचा उल्लेख केला. अनेक देशांत त्यासाठी मनुष्यबळ मंत्रालये कार्यरत आहेत. मात्र सध्याच्या नव्या पिढीला कमी काम, कमी वेळाचे काम आणि मोबदला मात्र अधिक, अशा कामाची अपेक्षा असल्याचे चित्र आहे. संघर्ष, परिश्रम न करता सारे काही सहज मिळावे, ही मानसिकता बदलण्याची गरज, त्यांनी बोलून दाखवली.

संवादसत्रानंतर उपस्थितांसह प्रश्नोत्तरेही झाली. त्यातून अनेक सूचना पुढे आल्या. ‘एएएसके’चे विभागप्रमुख अशोक आव्हाड यांनी अभिनव अभियांत्रिकी स्थापत्य केंद्रातील विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली. शौनक दबडघाव यांनी सूत्रसंचालन केले. जयदीप राजे यांनी आभार मानले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026