मानवतेचा परिघ विस्तारणे हाच खरा विकास: जैनाचार्य युगभूषणसुरीजी

By: Editor_Manas

On: Friday, March 13, 2026 5:01 PM

Google News
Follow Us

पुणे: तंत्रज्ञान आणि यंत्रांच्या साहाय्याने आपण भौतिक प्रगती कितीही केली, तरी जोपर्यंत मानवाच्या संवेदना आणि मूल्यांचा विकास होत नाही, तोपर्यंत तो खरा विकास म्हणता येणार नाही. जागतिक शांतता ही केवळ राजकीय चर्चा नसून, ती वैयक्तिक पातळीवर स्वतःपासून सुरू होणारी एक निरंतर प्रक्रिया आहे,” असे प्रतिपादन भगवान महावीरांच्या आध्यात्मिक परंपरेतील ७९ वे उत्तराधिकारी गच्छाधिपति परमपूज्य जैनाचार्य युगभूषणसुरीजी महाराज यांनी केले.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन आणि ‘ज्योत’ स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष संवाद सत्रात ते बोलत होते. याप्रसंगी शहरातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या विचारांचे स्वागत केले. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा आदी उपस्थित होते. प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित संशोधनाद्वारे समकालीन जागतिक प्रश्नांवर चिंतन करणाऱ्या ‘ज्योत’ या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

या विशेष संवाद सत्रात मार्गदर्शन करताना जैनाचार्य युगभूषणसूरिजी महाराजांनी भारतीय परंपरेच्या जागतिक महत्त्त्वावर विशेष भर दिला. आजच्या अत्यंत तणावपूर्ण आणि स्पर्धेच्या युगात केवळ भारतीय मूल्याधिष्ठित जीवनपद्धतीच संपूर्ण जगाला शांततेचा योग्य मार्ग दाखवू शकते. प्रगतीच्या शिखरावर पोहचताना मानवाने आपल्यातील अहंकाराचा पूर्णपणे निरास करणे आणि त्याऐवजी परोपकारी वृत्ती जोपासणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

“यंत्रांची प्रगती शरीराला भौतिक सुख देऊ शकते, पण मनाची शांती आणि जागतिक कल्याणाचे ध्येय गाठण्यासाठी आपल्याला पुन्हा मानवी मूल्यांकडेच वळावे लागेल. समाजाप्रती असलेली संवेदनशीलता हीच व्यक्तीला खऱ्या अर्थाने सुसंस्कृत बनवते, हा मोलाचा संदेश देत त्यांनी उपस्थित युवा पिढीला अंतर्मुख केले. ‘भारतीय ज्ञानपरंपरा – जागतिक अस्थिरतेवर उपाय’ आणि ‘सबरीमाला पुनर्विचार – भारतातील धर्माचे भविष्य’ या दोन विषयावर युगभूषणसुरीजी यांनी सखोल आणि विचारप्रवर्तक मांडणी करत जागतिक संघर्षांपासून संविधानिक प्रश्नांपर्यंत भारतीय ज्ञानपरंपरा आणि न्यायसत्ता याविषयी विवेचन केले.

युगभूषणसुरीजी म्हणाले, “आज जगात सर्वत्र अशांतता, अन्याय, अत्याचार, प्रदूषण, बेरोजगारी, अनारोग्य अशा अनेक समस्या आहेत. तथाकथित प्रगत, विकसित देशांनी ही परिस्थिती निर्माण केली आहे. युनोसारख्या जागतिक पातळीवरील सर्वोच्च व्यासपीठावर गेल्या ७५ पेक्षा अधिक वर्षे फक्त पाच देश नकाराधिकार गाजवतात, ही वस्तुस्थिती आहे. हे चित्र बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी अन्य देशांनी एकत्र येत जागतिक दबावगट निर्माण करावा. विश्वकल्याणाचा विचार मांडणारी आपली भारतीय ज्ञानपरंपरा आपण भौतिकतेच्या मोहापुढे विसरलो आहोत. आपल्या शास्त्रकार भगवंतांनी, ज्ञानतपस्वींनी जे मार्ग आचरले, ग्रंथबद्ध करून पुढील पिढ्यांकडे सोपवले, त्यांचे आपल्याला विस्मरण झाले आहे. त्या विचारांचे, त्या ज्ञानपरंपरेचे पुनर्जागरण करणे आता आवश्यक आहे.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सध्या जगभर तणावाची परिस्थिती वाढत आहे. भारतात सर्वोच्च न्यायालय सबरीमाला प्रकरणाच्या पुनर्विचारासाठी नऊ न्यायाधीशांच्या संविधानिक खंडपीठासमोर सुनावणी घेण्याची तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर जैनाचार्य युगभूषणसूरिजी महाराजा यांचे मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरेल. आधुनिक जगाला विश्वशांतीचा, अहिंसेचा मार्ग भारतीय विचारधारेतून मिळेल, असा विश्वास आहे. नव्या पिढीला त्यासाठी मार्गदर्शन मिळावे, हाच हेतू या उपक्रमामागे आहे.”

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात रंगलेल्या प्रश्नोत्तरांच्या सत्रात शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवरांनी वर्तमानातील समस्यांबाबत विचारलेल्या शंकांचे जैनाचार्य युगभूषणसुरीजी महाराज यांनी अभ्यासपूर्ण निरसन केले, ज्यामुळे हे सत्र अधिकच रंगतदार झाले. सुषमा चोरडिया यांनी महाराजांचे आभार मानले. ‘महाराजांच्या दिव्य विचारांमुळे संपूर्ण कॅम्पस पवित्र आणि चैतन्यमय झाला आहे,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमात गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक, कायदेतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर विचारवंतांसह ६०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026