पुणे | प्रतिनिधी – मानस : पुण्यातील सिंहगड किल्ला परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून, कात्रज ते सिंहगड या पायी मार्गावर चालताना एका डॉक्टरचा पाय घसरून तो थेट सुमारे 350 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र हवेली पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या अथक प्रयत्नांमुळे तब्बल पाच तासांच्या थरारक बचाव मोहिमेनंतर संबंधित डॉक्टरला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
चालताना घसरला पाय, दरीत पडला
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. प्रशांत नंदवते (वय 40, रा. कोल्हेवाडी) हे खेडशिवापूर येथील रुग्णालयात जाण्याच्या तयारीत होते. दरम्यान, रुग्ण येण्यास उशीर होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वेळ मिळाल्याने कात्रज ते सिंहगड या पायी मार्गावर चालण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला.
याच वेळी ‘चिलीमचा खड्डा’ या धोकादायक पॉईंटजवळ त्यांचा पाय घसरला आणि ते सुमारे 350 फूट खोल दरीत कोसळले.
112 वर कॉल करून दिली माहिती
दरीत कोसळल्यानंतरही डॉ. नंदवते यांनी धीर न सोडता तात्काळ 112 हेल्पलाईनवर कॉल करून मदत मागितली. ही माहिती मिळताच हवेली पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार समाधान चोरमले व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अंधारात रेस्क्यू ऑपरेशन
हवेली पोलिसांनी तत्काळ आपत्ती व्यवस्थापन पथकाशी संपर्क साधत संयुक्त बचाव मोहीम सुरू केली. पथकातील तानाजी भोसले, गणेश सपकाळ, वैभव भोसले, संतोष जाधव तसेच वनसंरक्षक समितीचे कैलास जरांडे यांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले.
अंधार पडत असतानाही दोरांच्या साहाय्याने एक सदस्य दरीत उतरला, तर इतरांनी वरून मार्गदर्शन केले. बॅटरीच्या प्रकाशात अवघड चढ-उतार पार करत सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर डॉ. नंदवते यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
प्रकृती स्थिर, नागरिकांकडून कौतुक
या घटनेत डॉ. नंदवते यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या धाडसी आणि यशस्वी बचाव मोहिमेबद्दल हवेली पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





