“अंधश्रद्धेपोटी पशुबळी देऊ नये” – डॉ. कल्याण गंगवाल यांचे आवाहन

By: Editor_Manas

On: Thursday, March 26, 2026 7:30 PM

Google News
Follow Us

पुणे : महाराष्ट्रातील जागृत देवी म्हणून गणल्या गेलेल्या कार्ला (लोणावळा) येथील कुलस्वामिनी एकवीरा देवीची वार्षिक यात्रेला देवीचा नवस फेडण्यासाठी तिथे भाविकांनी पशु व पक्षी यांचा बळी देऊ नये व अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये, असे आवाहन सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केले आहे.

कुलस्वामिनी एकवीरा देवीच्या वार्षिक यात्रेत दरवर्षी लाखो भाविक तेथे जमतात. नवस फेडण्यासाठी हजारो भाविक कोंबड्या, बकऱ्या आदींचा बळी देतात. या प्रथेविरोधात जागृती करण्यासाठी डॉ. गंगवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते यात्रास्थळी जाऊन पत्रके वाटणार, बॅनर लावणार तसेच भाविकांशी संवाद साधून या अनिष्ट प्रथेबाबत त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळातील प्रमुख मंत्री, कुलस्वामिनी एकवीरा देवी मंदिर ट्रस्टचे प्रमुख तसेच जिल्हाधिकारी आणि ग्रामीण पोलीस प्रमुख यांना निवेदने पाठविण्यात आली आहेत. यात्रेदरम्यान होणारा दारूचा वापर आणि पशुबळी थांबवण्यासाठी प्रशासनाने व मंदिर ट्रस्टने कडक धोरण राबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात वर्षानुवर्षे अनेक ठिकाणी देवींच्या जत्रांमध्ये पशुबळी देण्याची प्रथा चालत आली होती. तुळजापूर येथील देवी, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कोरथनचे खंडोबा यांसारख्या ठिकाणीही ही प्रथा प्रचलित होती. देवीला नवस फेडण्यासाठी पशुबळी देऊन तेथेच मांस शिजवणे आणि प्रसाद म्हणून त्याचे सेवन करणे, तसेच त्यापूर्वी मद्यप्राशन करणे, अशा प्रकारांमुळे सामाजिक व सांस्कृतिक अधःपतन होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

“कोणताही देव किंवा देवी ही भक्तांच्या भावनेची भुकेली असते, मांसाची नाही. अंधश्रद्धेमुळे चालत आलेल्या या प्रथांना आता पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. पुरणपोळी सारखा गोड नैवेद्य अर्पण करूनही श्रद्धा व्यक्त करता येते. दुसऱ्या प्राण्याचा जीव घेऊन देवी कधीही प्रसन्न होत नाही,” असे डॉ. गंगवाल यांनी स्पष्ट केले.

यात्रेदरम्यान उघड्यावर शिजवले जाणारे मांस, सांडलेले रक्त, दुर्गंधी आणि टाकण्यात येणारे प्राण्यांचे अवयव यामुळे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. यामुळे कुत्री, घुशी, उंदीर यांचा सुळसुळाट वाढतो, ही बाब चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, मोठ्या प्रमाणावर गर्दीमुळे चेंगराचेंगरीच्या घटना घडण्याची शक्यता असते. अशा दुर्घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेता, यात्रेदरम्यान भाविकांनी संयम बाळगून पशुबळी व मद्यप्राशन टाळावे आणि परिसर मंगलमय ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पशुक्रूरता प्रतिबंध कायदा तसेच मुंबई पोलीस कायदा कलम १०५ आणि न्यायालयीन आदेशानुसार देव-देवतांच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी पशुबळी देणे हा गुन्हा आहे. त्यामुळे प्रशासनाने अधिक सतर्क राहून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

मागील वर्षी पोलिसांनी यात्रेदरम्यान दारूबंदीबाबत कडक कारवाई केली होती, ही बाब समाधानकारक असल्याचे नमूद करत यंदाही तीच कडक अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

एकूणच, श्रद्धा आणि परंपरा जपत असताना अंधश्रद्धेला दूर ठेवणे गरजेचे असून, भक्तांनी देवीसमोर बळी नव्हे तर भक्ती अर्पण करावी, हा संदेश यानिमित्ताने देण्यात आला आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 26, 2026

March 26, 2026

March 26, 2026

Prime-Minister-Narendra-Modi-3

March 26, 2026

March 25, 2026

March 25, 2026