ॲपलचा मोठा प्लॅन? आयफोन 18 पुढे ढकलून फक्त प्रो आणि फोल्डेबलवर भर!

By: Editor_Manas

On: Tuesday, March 17, 2026 4:56 PM

Google News
Follow Us

प्रतिनिधी : मानस ॲपल सहसा दरवर्षी सप्टेंबरमध्ये आपल्या नव्या आयफोन मालिकेतील चार मॉडेल्स सादर करते. मात्र, यंदा कंपनी आपल्या या धोरणात मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. जपानी मीडिया कंपनी निक्केई एशियाच्या अहवालानुसार, ॲपल 2026 मधील वार्षिक कार्यक्रमात आयफोन 18 चे बेस मॉडेल लॉन्च करणार नाही. हे मॉडेल 2027 च्या पहिल्या सहामाहीपर्यंत पुढे ढकलले जाऊ शकते.

अहवालानुसार, मेमरी चिप्स आणि इतर घटकांच्या वाढत्या किमतींमुळे ॲपलने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. प्रीमियम मॉडेल्समधून अधिक महसूल आणि नफा मिळवण्यासाठी कंपनी आपल्या संसाधनांचा अधिक परिणामकारक वापर करू इच्छित आहे. ब्लूमबर्गचे मार्क गुरमन आणि विश्लेषक मिंग-ची कुओ यांनीही संकेत दिले आहेत की, ॲपल यंदा आयफोन 18 चे नियमित मॉडेल सादर करण्याच्या मनस्थितीत नसून, ते 2027 च्या सुरुवातीला आयफोन 18e सोबत लॉन्च केले जाऊ शकते.



या निर्णयामागील आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे ॲपलचा पहिला फोल्डेबल आयफोन. फोल्डेबल फोन तयार करण्यासाठी अधिक गुंतागुंतीचे औद्योगिक तंत्रज्ञान आणि नव्या प्रकारच्या सामग्रीची आवश्यकता असते. मास प्रोडक्शनदरम्यान तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी ॲपल आपले संपूर्ण लक्ष फोल्डेबल आणि प्रो मॉडेल्सवर केंद्रित करत असल्याचे मानले जाते. त्यामुळे यंदाच्या सप्टेंबर लॉन्च इव्हेंटमध्ये फक्त आयफोन 18 प्रो, आयफोन 18 प्रो मॅक्स आणि फोल्डेबल आयफोन सादर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लॉन्चिंग उशिरा होण्याच्या चर्चांदरम्यान आयफोन 18 च्या स्पेसिफिकेशन्सबाबतही अनेक माहिती समोर येत आहेत. सध्याच्या आयफोन 17 मॉडेलमध्ये 8GB रॅम मिळते, ती आयफोन 18 मध्ये 12GB पर्यंत वाढवली जाऊ शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 18 मेगापिक्सेलऐवजी 24 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी ॲपल ‘कॅमेरा कंट्रोल बटण’ अधिक सोपे करू शकते, ज्यात कॅपेसिटिव्ह टच सेन्सर नसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अहवालानुसार ॲपलकडे सध्या पाच नवीन मॉडेल्सची पाइपलाइन तयार आहे. यात आयफोन एअर 2, स्टँडर्ड आयफोन 18 आणि तीन प्रीमियम मॉडेल्स — आयफोन 18 प्रो, आयफोन 18 प्रो मॅक्स आणि आयफोन फोल्ड — यांचा समावेश आहे. मात्र, आयफोन एअर 2 च्या शिपमेंटबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

जाणकारांच्या मते, आयफोन एअर 2 हे मॉडेल 2027 मध्ये आयफोन 19 सिरीजसोबत लॉन्च केले जाऊ शकते. त्या मालिकेत प्रथमच बॅक पॅनलवर दुसरा कॅमेरा सेन्सरही पाहायला मिळू शकतो.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

OPPO India

April 27, 2026

OPPO India

April 27, 2026

April 27, 2026

April 27, 2026

Sbi एसबीआय

April 25, 2026

April 24, 2026