पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेली ६८वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा (२०२५-२६) येत्या १८ ते 22 मार्च दरम्यान वाघोली (पुणे) येथे सुरू होणार आहे. या स्पर्धेची रूपरेषा, नियोजन, बक्षिसांची माहिती तसेच विविध महत्त्वाच्या बाबींविषयी माहिती देण्यासाठी नुकतीच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
क्रीडांगणाचे काम ९९ टक्के पूर्ण मेघराज कटके यांनी सांगितले की, “महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी उभारण्यात येत असलेल्या क्रीडांगणाचे सुमारे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून अंतिम तयारी सुरू आहे. या क्रीडांगणात ४० ते ५० हजार प्रेक्षक बसू शकतील, अशी भव्य व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत”.
महिलांसाठी स्वतंत्र गॅलरी स्पर्धेदरम्यान महिला प्रेक्षकांसाठी स्वतंत्र आणि प्रशस्त गॅलरी तयार करण्यात आली आहे. उद्घाटनाच्या दिवशी महिलांना विशेष प्राधान्य देण्यात येणार असून त्यांच्या सोयीसाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे.
१८ मार्चला उद्घाटन सोहळा १८ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर २२ मार्च रोजी स्पर्धेचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कटके यांनी दिली.
वाईल्ड कार्डमधून १५ खेळाडूंची निवड नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या बैठकीत वाईल्ड कार्ड प्रवेशाबाबत चर्चा करण्यात आली. यासाठी ३६ खेळाडूंचे अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी १५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यात नामांकित कुस्तीपटू स्पर्धेत उतरणार आहेत.
४२ संघांचे ८५० खेळाडू मैदानात या स्पर्धेत राज्यातील ४२ संघांमधील सुमारे ८५० खेळाडू सहभागी होणार आहेत. खेळाडूंसाठी निवास, भोजन व इतर आवश्यक सोयींची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
चार आखाड्यांवर रंगणार सामने स्पर्धेसाठी क्रीडांगणात दोन मातीचे आणि दोन मॅटचे असे एकूण चार आखाडे उभारण्यात आले आहेत. उन्हाच्या तीव्रतेचा विचार करून स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून सकाळी ७ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते रात्री १० या वेळेत सामने खेळवले जाणार आहेत





