पिंपरी-चिंचवड: मोशी येथे शिवाजीवाडी- डुडुळगाव परिसरातील सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वर्गखोल्यांचा प्रश्न अखेर सुटला असून, तब्बल ४७० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हक्काच्या वर्गखोल्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, ही समाविष्ट गावांतील पहिली ‘सीबीएसई’ आणि इंग्रजी माध्यमाची शाळा आहे.
या शाळेसाठी २०१७ पासून महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र, २०२० ते २०२३ या कालावधीत वर्गखोल्यांच्या अभावामुळे एकाही विद्यार्थ्याला प्रवेश देता आला नव्हता. सध्या सुमारे १२५० विद्यार्थी वर्गखोल्यांच्या कमतरतेमुळे प्रवेशापासून वंचित होते. ज्या ठिकाणी एका वर्गात ४० मुले आणि ४० मुली असा प्रवेश दिला जातो, त्या ठिकाणी वर्गखोल्या नसल्यामुळे केवळ २०-२० विद्यार्थ्यांनाच प्रवेश द्यावा लागत होता.
या गंभीर समस्येकडे भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी लक्ष वेधून सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत महापालिका भूमि जिंदगी विभागाकडून शाळेसाठी आवश्यक वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या शिक्षण विभागाला हस्तांतरित केल्या आहेत. महापालिका प्रशासनाकडून या ठिकाणी एका शैक्षणिक संकूलाचे काम सुरू आहे. त्यामधील एका भागात ही शाळा सुरू होईल. त्या ठिकाणी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे.
मोशीतील श्री नागेश्वर मंदिराजवळ असलेल्या या शाळेत सीनियर केजी ते इयत्ता नववीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. नवीन वर्गखोल्या उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा मिळाल्या असून पालकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे मोशी परिसरातील शिक्षण व्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळण्यास मदत होणार आहे.





