इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; शेवटचे क्षण व्हिडिओत कैद

By: Editor_Manas

On: Sunday, March 29, 2026 2:00 PM

Google News
Follow Us

शिवपुरी (मध्य प्रदेश) | प्रतिनिधी – मानस : इन्स्टाग्राम लाईव्ह सुरू असताना २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात घडली आहे. शुक्रवारी (२७ मार्च) रात्री देहात पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली. मनोज रजक असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या शेवटच्या क्षणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोजने इन्स्टाग्रामवर लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू करून स्वतःला पंख्याला गळफास लावला. या लाईव्हदरम्यान तो सुमारे १४ मिनिटे ऑनलाईन होता. शेवटच्या क्षणी त्याने आपल्या मित्रांना हात हलवून निरोप दिला तसेच फ्लाईंग किसही दिला. ‘मैं अधूरा जी रहा हूँ’ हे गाणे तो ऐकत असल्याचेही समोर आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, त्याने सुरुवातीला कपड्यांच्या स्टॅण्डच्या साहाय्याने पंख्याला लटकण्याचा प्रयत्न केला; मात्र पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर त्याने मोबाईलचा अँगल व्यवस्थित करून पुन्हा प्रयत्न केला. लाईव्हदरम्यान येणाऱ्या कमेंट्स तो वाचत होता आणि मित्रांशी संवाद साधत होता.

घटनेची माहिती मिळताच त्याचे काही मित्र तत्काळ त्याच्या राहत्या खोलीकडे धावले. मात्र ते पोहोचेपर्यंत मनोजचा मृत्यू झाला होता. तो भाड्याच्या खोलीत एकटाच राहत असून प्लंबर म्हणून काम करत होता. घरातून कपड्यांचा छोटा व्यवसायही तो करत असल्याचे समोर आले आहे.

कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता, त्याच्या आईचे निधन झाले होते आणि वडिलांनी दुसरे लग्न केले होते. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. शवविच्छेदन अहवालानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now