दुकान खरेदीच्या बहाण्याने महिलेची १२ लाखांची फसवणूक; काका आणि चुलतभावानेच विश्वासाचा गैरवापर केल्याचा आरोप; दुकानाचा ताबा न देता चार वर्षांपासून टाळाटाळ

पुणे : दुकान खरेदीच्या बहाण्याने पुण्यातील एका महिलेची तब्बल 12 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, काका आणि चुलतभावानेच विश्वासाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नवी सांगवी परिसरात राहणाऱ्या संगीता राम कांबळे (वय 55) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा चुलत भाऊ सचिन चंद्रकांत प्रभाळे (रा. शुक्रवार पेठ, पुणे) आणि चुलते चंद्रकांत प्रभाळे (रा. गुरुवार पेठ, पुणे) यांनी दुकान विक्रीच्या व्यवहारात त्यांची आर्थिक फसवणूक केली. शुक्रवार पेठ येथील एक दुकान खरेदी करण्याचा प्रस्ताव आरोपींनी मांडला होता. सदर दुकानाची किंमत 20 लाख रुपये असल्याचे सांगत, व्यवहाराचा पहिला टप्पा म्हणून तात्काळ 12 लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली.

त्यावर विश्वास ठेवून संगीता कांबळे यांनी 14 डिसेंबर 2020 रोजी सारस्वत बँक, औंध शाखा येथून चेक क्रमांक 008981 द्वारे 12 लाख रुपयांची रक्कम आरोपींना दिली. या व्यवहारावेळी आरोपी सचिन प्रभाळे यांच्यासोबत त्यांचे वडील चंद्रकांत प्रभाळे, आई चंद्रकला प्रभाळे आणि पत्नी श्रद्धा प्रभाळे उपस्थित होते व त्यांनी व्यवहाराबाबत हमी दिली होती.

मात्र, तक्रारदार महिलेचा आरोप आहे की, त्यांनी दिलेली रक्कम स्वतःच्या उपयोगात आणण्यात आली. तसेच संबंधित दुकान त्यांच्या नावावर न करता, सचिन प्रभाळे यांनी ते दुकान स्वतःच्या नावावर खरेदी केले. त्यानंतर गेल्या तीन ते चार वर्षांपासून वारंवार पाठपुरावा करूनही दुकानाचा ताबा देण्यात आलेला नाही, तसेच घेतलेली रक्कमही परत करण्यात आलेली नाही. उलट, आरोपींकडून सातत्याने वेगवेगळे बहाणे करून मुद्दाम विलंब करण्यात येत असल्याचा आरोप आहे.

हा प्रकार पूर्वनियोजित आर्थिक फसवणूक आणि विश्वासघाताचा असल्याचे सांगत, संगीता कांबळे यांनी नमूद केले की, ही रक्कम त्यांनी व त्यांच्या पतीने तब्बल 32 वर्षांच्या कष्टातून जमवली होती. या घटनेमुळे त्यांचे गंभीर आर्थिक नुकसान झाले असून, मानसिक ताणतणावामुळे त्यांच्या पतींच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम झाला आहे.

या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात 30 डिसेंबर 2025 रोजी तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.