स्वयं पुनर्विकासातून झोपडपट्टीवासीयांना ‘आहे तिथे हक्काची घरे’ देणार; आबा बागुल यांचा निर्धार: प्रभागासह संपूर्ण पुणे शहर झोपडपट्टीमुक्त करणार

पुणे : स्वयं पुनर्विकासातून प्रत्येक झोपडपट्टीवासीयांना ‘आहे तिथे हक्काची घरे’ देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभागासह संपूर्ण पुणे शहर झोपडपट्टीमुक्त करण्याची आणि प्रत्येक झोपडपट्टीवासियाचे हित जोपासण्याची जबाबदारी सोपवली आहे.

त्यामुळे प्रत्येक झोपडपट्टीधारकाला ‘आहे तिथे हक्काची घरे’ कायदेशीररित्या देण्याचा निर्धार असल्याचे प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पद्मावतीमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पद्मावतीमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माजी उपमहापौर आबा बागुल आणि पॅनलच्या तीनही उमेदवारांची शाहू वसाहत येथे झालेल्या प्रचार सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी नागरिकांनी एसआरएबाबत व्यथा मांडल्या.

त्यावर आबा बागुल म्हणाले, आज झोपडपट्टीवासीय एसआरए योजनेतील अनागोंदीच्या कारभारामुळे त्रस्त आहेत. मूठभर विकसकांच्या फायद्यासाठी झोपटपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून झोपडपट्टीवासियांनाच वेठीस धरले जात आहे.धाक दडपशाहीच्या जोरावर गरिबांचे छत्र हिसकवण्याचा कारभार सुरु आहे. त्यामुळे अशा या ‘एसआरए’ योजनेला माझा तीव्र विरोध आहे.

शाहू वसाहत, दाते बस स्टॉप, तावरे कॉलनी, ५४/२ अण्णाभाऊ साठे वसाहत, संजयनगर, पद्मावती वसाहत असो प्रभागातील प्रत्येक झोपडीधारकाचे जीवनमान उंचावणे ही माझ्यासाठी योजना नाही,तर हा माझा शब्द आहे.

शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर प्रभागच काय संपूर्ण पुणे शहर झोपडपट्टीमुक्त करण्याची आणि प्रत्येक झोपडपट्टीवासियाचे हित जोपासण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे कोणत्याही झोपडपट्टीवासीचा हक्क हिरावला जाणार नाही हे शिवसेनेचे धोरणच आहे.

त्यामुळे स्वयं पुनर्विकासातून प्रत्येक झोपडपट्टीवासीयांना साडेसहाशे स्के. फुटाचे आहे तिथे घर मिळणार आहे. अशी ग्वाही आबा बागुल यांनी दिली.