खळबळ ! पिस्तुल काढलं अन् स्वत:वर धाड धाड गोळ्या झाडल्या, कांदिवलीत ४५ वर्षीय व्यक्तीचा टोकाचा निर्णय

खळबळ ! पिस्तुल काढलं अन् स्वत:वर धाड धाड गोळ्या झाडल्या, कांदिवलीत ४५ वर्षीय व्यक्तीचा टोकाचा निर्णय

मुंबईसह राज्यात आत्महत्यांच्या घटनांमुळे चिंतेचे वातावरण आहे. मुंबईतील कांदिवली पूर्वेतील पोईसर परिसरात सोमवारी ४५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत व्यक्तीचे नाव प्रभाकर चंद्रशेखर ओझा (वय ४५) असे असून त्यांनी स्वतःच्या परवाना असलेल्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच समता नगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालय येथे पाठवला आहे. या घटनेनंतर पोईसर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रभाकर ओझा यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास समता नगर पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, लातूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय येथे सहावीत शिकणाऱ्या अनुष्का किरण पाटोळे हिचा वसतिगृहात मृत्यू झाल्याच्या घटनेने वातावरण तापले आहे. दोन दिवसांपूर्वी अनुष्काचा मृतदेह वसतिगृहात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असला तरी कुटुंबीयांनी घातपाताचा आरोप केला आहे.

दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी, या मागणीसाठी कुटुंबीयांनी आज लातूर शहरातील गांधी चौक येथे रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीचे उपाययोजना केल्या.