व्यावसायिक वाहतूक ग्राहकांसाठी वित्तीय सेवा मजबूत करण्याकरिता टीव्हीएस मोटर कंपनीची मनबा फायनान्स लिमिटेडशी भागीदारी

By: Editor_Manas

On: Tuesday, December 30, 2025 5:02 PM

Google News
Follow Us

बेंगळुरू, 30 डिसेंबर, 2025 – दुचाकी आणि तिचाकी वाहन उत्पादनातील जगातील आघाडीची कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने मनबा फायनान्स लिमिटेडशी सामंजस्य करार केला आहे. कंपनीच्या व्यावसायिक वाहन श्रेणीसाठी लघु वित्त सेवा पुरविण्यासाठी हा करार आहे. भारतातील ग्राहकांना वाहन परवडण्याच्या टप्प्यात यावे आणि औपचारिक वित्तपुरवठा अधिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हावा, असे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे.

या करारांतर्गत टीव्हीएसच्या सर्व श्रेणींतील व्यावसायिक वाहनांसाठी मनबा फायनान्स लिमिटेडकडून मासिक हप्ताआधारित वित्तीय सेवा पुरवली जाईल. इंटर्नल कम्बशन इंजिन असलेल्या, तसेच इलेक्ट्रिक व्हेइकल श्रेणीतील सर्व प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या तिचाकी वाहनांना ही सेवा उपलब्ध असेल.

टीव्हीएसची व्यावसायिक वाहन श्रेणीची परिसंस्था अधिक बळकट करण्यासाठी या सहकार्याचा फायदा होईल. स्पर्धात्मक निधी योजना, वेगवान कर्ज वितरण आणि व्यवसायाचा ग्रामीण, तसेच निमशहरी भागांत शिरकाव यामुळे साध्य होईल. या भागीदारीत वित्त उपलब्धता सुलभ केल्याने नवोद्यमी आणि वाहनताफा असलेल्या व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यास मदत होईल.

डाउन पेमेंटचे आकर्षक पर्याय, कमी मासिक हप्ता आणि बचत व वित्तीय लवचीकता प्रदान करणाऱ्या योजना या सहकार्यामुळे उपलब्ध होणार असून, त्यामुळे ग्राहकांची क्रयशक्ती वाढणार आहे.

याबाबत बोलताना टीव्हीएस मोटर कंपनीच्या कमर्शियल मोबिलिटी विभागाचे व्यवसाय प्रमुख रजत गुप्ता म्हणाले, ग्राहकांना अधिकाधिक शाश्वती मिळावी, यासाठी सर्वंकष व्यावसायिक वाहतूक परिसंस्था उभारणे हे टीव्हीएस मोटर कंपनीचे उद्दिष्ट आहे. मनबा फायनान्स लिमिटेडबरोबर भागीदारी केल्याने आमच्या इंटर्नल कम्बशन इंजिन असलेल्या, तसेच इलेक्ट्रिक व्हेइकल तिचाकी श्रेणीतील वाहनांना स्पर्धात्मक वित्तीय सेवा सहज उपलब्ध होईल. परवडणारे पर्याय, वेगवान कर्जवितरण आणि ग्रामीण बाजारपेठांत विस्ताराद्वारे नवोद्यमी आणि वाहनताफा बाळगणाऱ्या व्यावसायिकांची मिळकत आणि व्यावसायिक विस्तारक्षमता वाढविण्याचा आमचा उद्देश आहे.

मनबा फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मनीष शाह या भागीदारीबद्दल म्हणाले, स्वच्छ आणि अधिक शाश्वत वाहतूक परिसंस्थेला सहकार्य करण्याप्रती असलेली आमची बांधिलकी टीव्हीएस मोटर कंपनीबरोबरच्या भागीदारीतून अधोरेखित होते. यामुळे प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या तिचाकी वाहनांना सर्वंकष आणि गरजांनुरूप वित्तीय सेवा देण्याची आमची क्षमता वाढेल. टीव्हीएस मोटर्सची या उद्योगातील तज्ज्ञता, मजबूत वितरण जाळे, विश्वासार्हता यामुळे मनबा फायनान्सला तिचाकी वाहन वित्तपुरवठा श्रेणीत पाय रोवण्याची संधी आहे. या क्षेत्रात आर्थिक वर्ष २६ आणि त्याही पलीकडे वाढ आणि विस्ताराला चालना देण्यासाठी ही भागीदारी कळीची ठरेल, अशी अपेक्षा आहे.

उत्पादनांपलीकडे जाऊन उपलब्धता, परवडण्याची क्षमता आणि दीर्घकालीन ग्राहकवृद्धी प्रदान करणारी सर्वंकष व्यावसायिक वाहतूक परिसंस्था उभारण्यावरील टीव्हीएस मोटर कंपनीचा असलेला भर या भागीदारीमुळे आणखी दृढ झाला आहे. 

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026