“दिवसा दरोडे पडत असतील तर सामान्य नागरिक सुरक्षित कसा?” – संतप्त प्रतिक्रिया
विशाल भालेराव
खानापूर – खानापूर परिसरात भर दिवसा घडलेल्या दरोड्याच्या घटनेमुळे हवेली तालुक्यातील खानापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गजबजलेल्या वेळेत घडलेल्या या प्रकारामुळे नागरिक, व्यापारी, महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर लोकप्रतिनिधी व सामाजिक पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरोडेखोरांनी कोणतीही भीती न बाळगता, अगदी नियोजनबद्ध पद्धतीने काही मिनिटांत दरोडा टाकून पलायन केल्याने खानापूरमधील पोलीस गस्त, प्रतिबंधात्मक यंत्रणा व सीसीटीव्ही व्यवस्थेची कार्यक्षमता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
लोकप्रतिनिधींची ठाम भूमिका
सरपंच शिल्पा गायकवाड यांनी या घटनेवर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देताना सांगितले की,
“खानापूरसारख्या शांत गावात भर दिवसा दरोडा पडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे महिलांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना करून नागरिकांचा विश्वास पुन्हा मिळवावा.”
माजी सरपंच शरद (लालाशेठ) जावळकर यांनी व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करताना म्हटले की,
“भर दिवसा दरोडा पडतो, याचा अर्थ गुन्हेगारांना कायद्याची भीती उरलेली नाही. केवळ गुन्ह्यानंतर तपास करून उपयोग नाही, तर गुन्हे होण्याआधी प्रतिबंधात्मक कारवाई झाली पाहिजे.”
माजी पंचायत समिती सदस्य संजय जावळकर यांनी गस्त व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवत सांगितले की,
“बाजारपेठ, चौक आणि वर्दळीच्या ठिकाणी नियमित पोलीस गस्त पाहीजे. त्यामुळे गुन्हेगारांना मोकळे रान मिळत आहे. पोलीस प्रशासनाने तात्काळ गस्त वाढवून दृश्यमान बंदोबस्त ठेवावा.”
श्री काळभैरवनाथ पतसंस्थाचे, उपाध्यक्ष नंदकुमार जावळकर यांनी सामाजिक सुरक्षिततेचा मुद्दा मांडत म्हटले की,
“खानापूर हे धार्मिक, व्यापारी व ग्रामीण दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. अशा ठिकाणी असुरक्षिततेची भावना निर्माण होणे योग्य नाही. पोलीस, ग्रामपंचायत व नागरिक यांच्यात समन्वय साधून संयुक्त सुरक्षा आराखडा राबवला पाहिजे.”
व्यापारी व नागरिक भयभीत
या घटनेनंतर अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने लवकर बंद ठेवण्यास सुरुवात केली असून, महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “दिवसा घराबाहेर पडणेही धोक्याचे वाटत आहे,” अशी प्रतिक्रिया भाजप व्यापारी संघटनेचे नंदकुमार जावळकर नागरिक देत आहेत.
- ठोस उपाययोजनांची मागणी
- लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून पुढील मागण्या करण्यात येत आहेत
- बाजारपेठ व मुख्य चौकात २४ तास पोलीस गस्त
- सर्व संवेदनशील ठिकाणी अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे
- सराईत व संशयित गुन्हेगारांवर पूर्वतयारी कारवाई
- रात्रीच्या वेळी कोम्बिंग ऑपरेशन
- ग्रामपंचायत, देवस्थान ट्रस्ट व व्यापारी संघटनांच्या समन्वयातून संयुक्त सुरक्षा व्यवस्था
पोलीस प्रशासनाची कसोटी
खानापूरसारख्या भागात जर अशा घटना वारंवार घडू लागल्या, तर त्याचा सामाजिक व आर्थिक परिणाम होणार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आश्वासनांपुरते न राहता प्रत्यक्ष, कठोर आणि परिणामकारक कारवाई तातडीने करावी, अशी ठाम मागणी होत आहे.









