नेत्रदान जनजागृती रॅली उत्साहात पार पडली

By: Editor_Manas

On: Monday, December 29, 2025 1:28 PM

Google News
Follow Us

पुणे, प्रतिनिधी — दूधभाते नेत्रालय व रेटिना सेंटर आणि सोशल अवेअरनेस कमिटी, नांदेड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड सिटी परिसरात नेत्रदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. नागरिकांमध्ये नेत्रदानाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि समाजात सकारात्मक संदेश देणे हा या रॅलीचा उद्देश होता.

रॅलीदरम्यान “नेत्रदान – श्रेष्ठदान” आणि “दृष्टी द्या, जीवन उजळवा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. फलक, बॅनर आणि संदेशात्मक पोस्टर्सच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. या उपक्रमात हॉस्पिटलचे कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेतला.

उपस्थितांना संबोधित करताना दूधभाते नेत्रालय व रेटिना सेंटरचे संचालक डॉ. अनिल दूधभाते यांनी देशात आजही लाखो नागरिक दृष्टीहिन असल्याचे सांगितले. नेत्रदानामुळे अशा व्यक्तींना नवजीवन मिळू शकते, मात्र नेत्रदान करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने समाजात याबाबत व्यापक जनजागृतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एका मृत व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन दृष्टीहिन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी ऑप्टोमेट्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली नेत्रदान विषयावरील नाटिका उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरली. प्रभावी, वास्तववादी आणि प्रबोधनात्मक मांडणीमुळे या नाटिकेने उपस्थितांच्या मनावर ठसा उमटवला.

या रॅलीमुळे समाजात नेत्रदानाबाबत जागरूकता वाढण्यास निश्चितच हातभार लागेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

या उपक्रमासाठी अभिनेत्री मेघा पवार, मा. काका चव्हाण, अनिता इंगळे, पीएमसी लायगुडे हॉस्पिटलच्या अध्यक्षा डॉ. अस्मिता बोधे, नरसिंगजी लगड, विकास लगड, डॉ. राम पडळकर, पीडीसीसी बँकेचे संचालक प्रवीण शिंदे, रवी कल्याणी, सुधीर काळकर, सुजित कार्ले, विशाल कदम, अविनाश लगड, डॉ. शिरीष पाटील, विमलताई लांडे, डॉ. वैशाली गोमसाळे, प्रताप पाटील, गिरीश वसेकर यांच्यासह दूधभाते नेत्रालय व रेटिना सेंटरचे संचालक डॉ. अनिल दूधभाते, डॉ. डिंपल दूधभाते, डॉ. आसावरी चव्हाण, डॉ. उमेश कुलकर्णी, डीजीएम गणेश मोटे, हॉस्पिटल मॅनेजर शीतल हिराळकर, डॉ. स्नेहल मानपुत्र आणि हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026