बिबवेवाडी परिसरात मोठा अनर्थ टळला; अनियंत्रित ट्रक थेट सोसायटीत घुसला

पुणे : बिबवेवाडी परिसरात आज सकाळच्या सुमारास मोठा अनर्थ टळला. बांधकामाच्या साईटवर जात असताना भरगच्च भरलेला ट्रक उतारावर नियंत्रण सुटल्याने मागे घसरत आला. या ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोला धडक दिली आणि थेट योगायोग सोसायटीच्या आवारात घुसला. ही घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नाही. मात्र योगायोग सोसायटीच्या संरक्षक भिंतीसह काही भागाचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. सकाळची वेळ असल्याने याच मार्गावरून ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग वॉकसाठी, महिला, युवक तसेच शाळकरी मुले वर्दळ करत असतात. अशा वेळी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत भरवस्तीच्या भागात जड वाहने आणि व्यावसायिक ट्रक कशाच्या आधारावर फिरतात, असा सवाल उपस्थित केला.

महेश नगर सोसायटीचा ड्रेनेज लाईन चा प्रश्न न सुटल्याने पर्यायी मार्ग म्हणून या रस्त्याने वाहने वळवली असता या घटना होत आहेत. “आमचा जीव धोक्यात घालून किती दिवस जगायचे?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून करण्यात आला असून प्रशासनाने यावर ठोस कारवाई करावी, वारंवार सांगून सुद्धा गति रोधक (speed breaker) लावले नसल्याने अशा घटना वारंवार घडतात त्यामुळे गतिरोधकांची व्यवस्था तत्काळ करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार गौरव गणेश घुले यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला तसेच या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे पत्रव्यवहाराद्वारे करण्यात येणार असल्याचे सांगितले.

भर सकाळच्या वेळी अशा प्रकारच्या घटना घडणे अत्यंत गंभीर असून, जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध आणावेत व रहिवासी भागात सुरक्षिततेचे उपाय तातडीने राबवावेत, अशी मागणीही घुले यांनी केली आहे.