अजरामर मराठी गीतांचा सुरेल नजराणा पुणेकरांना समर्पित

By: Editor_Manas

On: Wednesday, December 31, 2025 5:13 PM

Google News
Follow Us

पुणे: शब्दांवाचून कळले सारे… रिमझिम पाऊस पडे, गेला मोहन कुणीकडे… कौसल्येचा राम बाई… शुक्रतारा मंदवारा… निज माझ्या नंदलाला रे… ही कुणी छेडिली तार… अशा अजरामर मराठी गीतांचा सुरेल नजराणा पुणेकरांसमोर पेश झाला अन् रसिकांच्या मनाचा ठाव घेत ‘शतजन्म शोधताना’चा दहावा प्रयोग सादर झाला. निमित्त होते, विद्यार्थी साहाय्यक समितीतर्फे देणगीदार, हितचिंतक यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून आयोजित सॅब इव्हेंट्स प्रस्तुत ‘शतजन्म शोधताना’ या लाईव्ह कॉन्सर्टचे!

गणेश कला क्रीडामंच येथे हा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रतिसादात झाला. संगीतकार, दिग्दर्शक देवेंद्र भोमे यांच्या संकल्पनेतून, अभिनेत्री व कवयित्री स्पृहा जोशी हिच्या ओघवत्या निवेदनातून साकारलेल्या या कार्यक्रमात दिग्गज गीतकार व संगीतकारांच्या अवीट रचना, आठवणी व किश्श्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, क्रिसेंट म्युचुअल फंड डिस्ट्रीब्युटर्सचे भूषण वाणी यांच्यासह सर्व विश्वस्त, माजी विद्यार्थी, देणगीदार, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मध्यंतरात गायक व वादक, प्रायोजक भूषण वाणी आणि अंजली अंतुरकर यांचा सत्कार करण्यात आला. समितीच्या नवीन चित्रफितीचे, अमेरिकेत सुरू झालेल्या विद्यार्थी सहाय्यक समिती फाउंडेशनच्या वेबसाईटचे उद्घाटनही झाले.

ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम, सुधीर फडके, वसंत देसाई, राम कदम यांसारख्या दिग्गज गीतकार व संगीतकारांच्या अजरामर व हृदयस्पर्शी रचनांचे सादरीकरण झाले. सोबतच त्यांच्या न ऐकलेल्या आठवणी, किस्से सांगत देवेंद्र भोमे व स्पृहा जोशी यांनी ही मैफल रंगवली. काही दुर्मिळ ध्वनिचित्रफितीही दाखवण्यात आल्या. मुक्ता जोशी, आशुतोष मुंगळे, जयदीप वैद्य, राजेश्वरी पवार, शमिका भिडे व भूषण मराठे यांच्या गायनाने रसिकांची मने जिंकली. तेरा वर्षीय व्हायोलिन वादक रितिका जोगळेकरच्या वादनाला टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. तबल्यावर केतन पवार, ढोलकीवर मंदार बगाडे, बासरीवर धवल जोशी, व्हायोलिनवर रितिका जोगळेकर, कोरसमध्ये अर्णव जोशी, इशिता सावळे, नम्रता निमये व केदार चिखलकर यांनी साथसंगत केली. मयूर वैद्य यांनी संयोजन केले.

‘यांचं हे असं का होतं मला कळत नाही’ ही स्पृहाने सादर केलेली कविता, पु. लं. यांची ‘बटाट्याची चाळ’ ही आशुतोषने सादर केलेली सांगीतिका, त्यानंतर ‘येग येग विठाबाई’, ‘विठूमाऊली तू’, ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’, ‘खेळ मांडियेला वाळवंटी’ या मिश्रणातून सादर झालेली भक्तिगीते, ‘पदरावरती झरतारीचा’, ‘बाई माझी करंगळी मोडली’, ‘फड सांभाळ तुऱ्याला आला’ या ठेका धरायला लावण्या, ‘सांगा मुकुंद कुणी हा पाहिला’, ‘घननीळा लडिवाळा’, यांसारखी भावगीते रसिकांच्या मनात कोरली गेली. भीमपलास रागातील ‘इंद्रायणी काठी, देवाची आळंदी’ या अभंगाने कार्यक्रमाची सांगता झाली.

मराठी रसिकांच्या मनात घर केलेली व आपलीशी वाटणारी मराठी गाणी पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचे देवेंद्र भोमे म्हणाले. प्रतिभावान कलाकारांच्या या अजरामर रचना पिढ्यानपिढ्या ऐकल्या जात आहेत. त्यांचा हा अमूल्य ठेवा नव्या पिढीलाही मिळावा, या उद्देशाने ‘शतजन्म शोधताना’ अधिक व्यापक करीत आहोत, असे स्पृहा जोशी हिने नमूद केले. समितीत समर्पित भावनेने विद्यार्थी घडवण्याचे कार्य केले जाते. या कार्याला आपलाही हातभार असावा, या उद्देशाने समितीशी जोडला गेलो असून, समितीच्या कार्याला मदत करण्यासाठी दानशूरांनी पुढे येण्याचे आवाहन भूषण वाणी यांनी केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026