Zilla Parishads – Panchayat Samiti Elections 2025 : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया वेग घेत आहे. पहिल्या टप्प्यात नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुका अंतिम टप्प्यात पोहोचल्या असताना, आता जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समिती निवडणुकांची चर्चा जोरदार सुरू आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांसाठी संभाव्य तारीख पुढे आली असून ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समितींच्या निवडणुका ५ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, नांदेड, बीड, अहमदनगर, अमरावती यांसह अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील निवडणुका रखडल्या आहेत. आता त्यांची प्रक्रिया सुरु होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी ११२ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली असून, हे अधिकारी दोन आठवड्यांत बदलीच्या ठिकाणी हजर होऊन कार्यभार स्वीकारतील. यानंतर विभागीय आयुक्तांकडून दैनंदिन अहवाल मागवले जातील. हे अहवाल प्राप्त झाल्यावर दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगातील विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. नोव्हेंबर अखेरीस अथवा डिसेंबरच्या सुरुवातीस आयोग पत्रकार परिषद घेऊन वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे.
संभाव्य वेळापत्रक :
-
निवडणूक तारीख : ५ डिसेंबर (अपेक्षित)
-
अर्ज दाखल करण्यासाठी कालावधी : ७ दिवस
-
अर्ज मागे घेण्यासाठी मुदत : पुढील ७ दिवस
-
छाननी व अंतिम यादी जाहीर : अर्ज प्रक्रियेनंतर
-
निवडणुका पूर्ण करण्याची अंतिम मुदत : ३१ डिसेंबर
राज्यातील तिसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. ३१ जानेवारीपूर्वी महापालिका निवडणुका पार पडतील, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे. डिसेंबर अखेरीस राज्यातील सर्व २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबई व ठाण्यासह सर्व महापालिकांना एकाच वेळी मतपेट्यांकडे जावे लागण्याची माहिती मिळत आहे.








