Pune Accident : पुण्यात भयंकर रेल्वे अपघात, ट्रेनने ३ तरुणांना चिरडलं
पुण्यामध्ये भीषण रेल्वे अपघाताची घटना घडली. भरधाव ट्रेनने ३ तरुणांना धडक दिली. या अपघातामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मांजरी रेल्वे स्थानकाजवळील गोपाळपट्टी परिसरात ही घटना घडली. पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनने त्यांना धडक दिली. हे तिन्ही तरून फुटबॉलसारखे उडाले. या रेल्वे अपघातामुळे पुण्यात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही रेल्वे अपघाताची घटना रविवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रथमेश नितीन तिंडे, तन्मय महेंद्र तुपे आणि तुषार शिंदे अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तरूणांची नावं आहेत. हे तिघेही तरुण पुण्यात राहणारे होते. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये तिन्ही तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे झाले.
रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अपघातामध्ये मृत्यू झालेल्या ३ तरुणांसह ५ जण मांजरी रेल्वे स्थानकाजवळील गोपाळपट्टी परिसरात रेल्वे रूळावर एकत्र आले होते. त्याचवेळी पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रेनने त्यामधील तिघांना धडक दिली. या अपघातानंतर दोघे जण घाबरून घटनास्थळावरून निघून गेले.
रेल्वे अपघाताची माहिती मिळताच हडपसर आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही मृत तरुणांचे मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून दिले आहेत. हे तरूण नेमके या ठिकाणी का गेले होते? याबाबत नेमकी माहिती पोलिस मिळवत आहेत. मृत तरुणांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली असून मुलांच्या मृत्यूमुळे त्यांना मोठा धक्का बसला.









