सामाजिक कार्यकर्त्या मिनल देशमुख यांचे निधन

पुणे: सामाजिक कार्यकर्त्या आणि मराठी माझा अभिमान या संस्थेच्या संस्थापिका मिनल देशमुख यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ५६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, भावजय व भाची असा परिवार आहे. येरवड्यातील वैकुंठात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सातत्याने समाजासाठी काही करण्याची ओढ मनात घेऊन मिनल देशमुख अखेरपर्यंत कार्यरत होत्या. सर्वांना एकत्र आणून सामाजिक सण, वाढदिवस, पारंपरिक उत्सव साजरे करण्यात त्यांचा पुढाकार असे. स्वामीभक्त असलेल्या मिनल शिस्तप्रिय, मेहनती आणि महत्त्वाकांक्षी होत्या. मराठी असण्याचा आणि मराठी संस्कृतीचा त्यांना प्रचंड अभिमान होता. मिनल देशमुख यांचा स्वभाव अतिशय स्पष्टवक्ती, परंतु ठाम मतवादी आणि सरळ होता. अनेकांसाठी त्या उत्तम मैत्रीण, मार्गदर्शक आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व होत्या.

‘मराठी माझा अभिमान’ या संस्थेमार्फत मराठी समुदायाला जोडण्याचे काम त्या करीत होत्या. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी त्या झटल्या. साकोरेनगर आणि विमाननगर येथील लोकांच्या मनात त्यांच्या कार्याची अमिट छाप राहिली आहे. जवळजवळ १५ वर्ष साकोरेनगरमधील लाईट आणि पाण्याच्या विषयावर त्यांनी काम केले. बहुभाषिक असलेल्या या भागात ‘दिवाळी पहाट’सारख्या उच्च दर्जाच्या उपक्रमाची सुरुवात केली. गेल्या दोन वर्षांपासून या सांगीतिक मैफलीला उदंड प्रतिसाद मिळत होता. त्यांच्या दूरदृष्टीमुळे ह्या कार्यक्रमांना समाजात विशेष ओळख मिळाली. त्यांच्या कार्याचा हा वारसा पुढे घेऊन जाणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे. .