आमदार संजय गायकवाड यांच्या दीड कोटींच्या डिफेंडर कारचे रहस्य उघड; म्हणाले, ‘ती गाडी १००% कर्जातून, माझ्या नातेवाईकाची’

बुलढाणा: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड हे सध्या एका नव्या वादात अडकले आहेत. बुलढाणा भाजप जिल्हाध्यक्षांनी दीड कोटी रुपयांच्या नव्या कोऱ्या डिफेंडर कारवरून गंभीर आरोप केले होते. ही कार कोणत्या कामातील कमिशनमधून मिळाली, असा सवाल भाजप जिल्हाध्यक्षांनी विचारला होता.

यावर आमदार संजय गायकवाड यांनी अखेर खुलासा केला आहे.

गाडी कोणाची? आमदार गायकवाडांचे स्पष्टीकरण:

जिल्ह्यात आणि माध्यमांमध्ये ज्या गाडीची चर्चा सुरू आहे, ती गाडी निलेश ढवळे या कंत्राटदाराची आहे. आमदार गायकवाड यांनी स्पष्ट केले की, निलेश ढवळे हे त्यांचे नातेवाईक असून पक्षाचे कार्यकर्ता देखील आहेत.

गायकवाड पुढे म्हणाले, “निलेशने १०० टक्के कर्ज काढून ती गाडी घेतलेली आहे आणि काही दिवस वापरण्यासाठी ती गाडी मी माझ्याकडे बोलावली आहे. माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर आमदाराचा सिम्बॉल लावला आहे, त्यात काही गैर नाही.”

भाजप जिल्हाध्यक्षांवर पलटवार:

कमिशन घेतल्याचा आरोप करणाऱ्या भाजप जिल्हाध्यक्षांवर आमदार गायकवाड यांनी जोरदार पलटवार केला आहे. “ज्यांनी माझ्यावर कमिशन म्हणून आरोप केले, त्या कुत्र्यांना मला उत्तर द्यायची गरज नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

महायुतीत वाद उफाळला:

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात महायुतीत (भाजप आणि शिवसेना शिंदे गट) तणाव वाढल्याचे दिसत आहे. आमदार संजय गायकवाड यांच्याकडील दीड कोटींच्या लक्झरी लँड रोव्हर डिफेंडर कारवरून हा वाद उफाळून आला आहे.

भाजप जिल्हाध्यक्षांचा नेमका आरोप:

भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी थेट आमदार संजय गायकवाड यांच्यावर कमिशन घेतल्याचा गंभीर आरोप केला होता. नगराध्यक्षपदासाठी भाजपचा विचार झाल्यासच युती शक्य असल्याचा इशारा देत शिंदे म्हणाले होते, “बुलढाण्यात बेडकासारखं युती पाहिजे… युती पाहिजे असं म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीने काल दीड कोटी रुपयांची डिफेंडर आणली. ती एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर असून ती कोणत्या कामातील कमिशनमुळे या लोकप्रतिनिधीला मिळाली याची चौकशी व्हावी.” त्यांनी आमदार गायकवाडांवर मतदारांचा अपमान केल्याचाही आरोप केला होता.