राउंड ग्लास आणि गुमनहेरा अकादमी उपांत्य फेरीत

पुणे, ऑक्टोबर: नवव्या एसएनबीपी ऑल इंडिया (१६ वर्षांखालील मुले) हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत गतविजेता राउंड ग्लास गुमनहेरा अकादमीशी दोन हात करेल. दुसऱ्या लढतीत, आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी आणि ओडिशा नेव्हल टाटा ग्रासरूट्स अकादमी संघ आमनेसामने आहेत.

शिव छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या एकतर्फी सामन्यात ओडिशा नेव्हल टाटा ग्रासरूट्स अकादमीने यजमान एसएनबीपी अकादमीला ७-० अशा फरकाने हरवले. उपांत्य फेरीत प्रवेश करणारा तो पहिला संघ ठरला. त्यात अजिब लुगुन (१२ व्या मिनिटाला, १६ व्या मिनिटाला), विकास माझी (४० व्या मिनिटाला, ५५ व्या मिनिटाला) तसेच माझी मोहनने (८ व्या मिनिटाला, ३१व्या मिनिटाला) प्रत्येकी २ तसेच आशिक सुरीनने (९व्या मिनिटाला) एक गोल केला. यातील ४ गोल पेनल्टी कॉर्नरवर झाले. २०२१मध्ये तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या एसएनबीपीने सर्व आघाड्यांवर निराशा केली.

दुसऱ्या क्वार्टरफायनलमध्ये गुमनहेरा अकादमीने २०२१ मधील विजेत्या सेल एच.ए.चा ६-५ असा पराभव केला. सिद्धार्थ राजूने(५ व्या मिनिटाला, ३६ व्या मिनिटाला, ५५ व्या मिनिटाला) मैदानी गोलांची हॅट्ट्रिक करून विजयात मोलाचा वाटा उचलला. सुशांत सेहारवत (३३ व्या मिनिटाला), जय रविंदर (४३ व्या मिनिटाला) आणि सिनु आर्यनने (२० व्या मिनिटाला) प्रत्येकी एक गोल करत त्याला चांगली साथ दिली.

२०१९ मध्ये तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या सेल एच.ए. संघाने चांगलीच झुंज दिली. त्यांच्याकडून कुजूर कैलेश (२१ व्या मिनिटाला) आणि कर्णधार एडिसन कुजूरने (२८ व्या मिनिटाला) पेनल्टी कॉर्नरवर तसेच दिनेश बार्ला (१६ व्या मिनिटाला), समीर एक्का (३६ व्या मिनिटाला) आणि विकास केथा यांनी (५५ व्या मिनिटाला) मैदानी गोल केले.

दुपारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या तिसऱ्या सामन्यात, २०२४ मधील विजेत्या राउंड ग्लास अकादमीने जेएआय एच.ए. संघाचा ९-० असा धुव्वा उडविला. राउंड ग्लास संघाने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत मध्यंतराला ३-० अशी आघाडी घेतली. वरिंदर सिंगची गोल हॅट्ट्रिक (२ व्या मिनिटाला, १८ व्या मिनिटाला, ४९ व्या मिनिटाला), रोमित पालचे दोन गोल (४०’; ४८’) तसेच प्रल्हाद पांडे (२४ व्या मिनिटाला),  अर्शदीप सिंग (३५’), अर्जनदीप सिंग (४४’ आणि अर्शप्रीत सिंगचा (५८’) प्रत्येकी एक गोल त्यात निर्णायक ठरला.

चौथ्या क्वार्टरफायनलमध्ये, गेल्या वर्षीच्या उपविजेत्या आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनीने आर.के. रॉय अकादमीवर ३-० असा विजय मिळवला. मध्यंतरला गोलशून्य बरोबरी होती. आर्मी बॉईजनी तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये राकेशेश्वर रावने (३९’, ४६’) पेनल्टी कॉर्नरवरून दोन गोल केले. तिसरा गोल प्रशांत ऐंदने (५७’) केला.

निकाल (पाचवा दिवस; उपांत्यपूर्व फेरी): 

उपांत्यपूर्व फेरी १: ओडिशा नेव्हल टाटा ग्रासरूट्स अकादमी: 7(माझी मोहन 8’, 31’; आशिक सुरिन 9’; अजिब लुगुन 12’, 16’; विकास माझी 40’, 55’) विजयी वि. एसएनबीपी अकादमी: 0. मध्यंतर: 4-0.

उपांत्यपूर्व फेरी २: गुमनहेरा अकादमी: 6(सिद्धार्थ राजू 5′, 36′, 55′; सुशांत सेहरावत 33′; जय रविंदर 43′; सिनू आर्यन 20′) विजयी वि. सेल एचए: 5(दिनेश बार्ला 16′; कैलाश कुजुर 21′; कैलाश कुजूर ईकाई; 23′; 28’; विकास काथे 55’). मध्यंतर: 0-2.

उपांत्यपूर्व फेरी ३: राउंड ग्लास अकादमी: 9(वरिंदर सिंग 2′, 18′ 49′; प्रल्हाद पांडे 24′; अर्शदीप सिंग 35′; रोमित पाल 40′; 48′; अर्जनदीप सिंग 44′; अर्शप्रीत सिंग 58′) वि. जयपूर एच.ए: 0. मध्यंतर: 3-0.

उपांत्यपूर्व फेरी ४: आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी: 3(राकेशेश्वर राव 39′, 46′; प्रशांत ऐंद 57′) विजयी वि. आर.के. रॉय अकादमी: 0. मध्यंतर: 0-0.