पुणे, ता. : घन:शाम सुंदरा अरुणोदय झाला… गगन सदन तेजोमय… बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात… पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले… वेडात मराठे वीर दौडले सात… त्या तिथे पलिकडे माझिया प्रियेचे झोपडे… अशा एकापेक्षा एक सरस अजरामर गीतांनी दिवाळी पहाट रंगत गेली. श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद अन ‘वन्स मोअर’ची फर्माईश दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारी ठरली.
निमित्त होते, मराठी माझा अभिमान असोसिएशनतर्फे विमाननगर येथील सिम्बायोसिसच्या सभागृहात आयोजित सुरमयी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे! प्रसिद्ध गायक ऋषिकेश रानडे आणि गायिका प्राजक्ता रानडे यांनी सुमधुर सादरीकरण, तर मिलिंद कुलकर्णी यांचे ओघवते निवेदन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पाठारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन संगीत मैफलीला प्रारंभ झाला. प्रसंगी पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते अली दारूवाला, शहर उपाध्यक्ष अर्जुन जगताप, रामभाऊ दाभाडे, राहुल भंडारे, अनिल सातव, ओशन दरबार यांची प्रमुख उपस्थिती होती. मध्यंतरात शाल व संस्थेचे सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणाऱ्या गीतांचे सादरीकरण झाले. प्रथम तुझं पाहता, कारे दुरावा कारे अबोला, अपराध असा माझा काय झाला, राहिले दूर माझे घर, जीव रंगला, अशा बहारदार गीतांनी मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. ऋषिकेश व प्राजक्ता यांनी एकल, युगुल गीते सादर केली. ने मजसी ने परत मातृभूमीला या गाण्याने मैफलीची सांगता झाली. ‘आनंद’ चित्रपटातील गीतांनी श्रोत्यांना भावुक केले.
संस्थेच्या अध्यक्ष मीनल देशमुख यांच्या मार्गदर्शनात उपाध्यक्षा अनिता लोखंडे, सचिव रेखा वाबळे, खजिनदार वृषाली मिरजगावकर, सदस्या मुक्ता जगताप, अश्विनी देसाई, स्नेहा सांडभोर, ऍड. नीलिमा चव्हाण, अनिता नेवे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले.









