पुणे: शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री या देवीस्तुतीतील नऊ देवींच्या रुपांचे साजेसे वर्णन करत नवदुर्गेचा सांगीतिक जागर रसिकांनी अनुभवला. रागदारी, दोन वेगवेगळ्या शैलीतून चितारलेल्या देवींच्या बालरूपातील आणि तरुणरूपातील मनमोहक चित्रांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
निमित्त होते, भाग्यश्री गोडबोले यांच्या देवींवरील स्वरचित बंदिशींच्या ‘नवदुर्गा’ सादरीकरणाचे! नवरात्रीनिमित्त अविष्कार क्रिएशन्सतर्फे शनिवार पेठेतील गांधर्व महाविद्यालय, तसेच अष्टभुजा देवी मंदिरात कलाकारांनी शास्त्रीय संगीतातील विविध रागांमधे बंदिशी सादर करीत नवदुर्गेचा जागर केला. कर्णमधुर व भावपूर्ण रागदारीने नटलेल्या या बंदिशी ऐकून श्रोते मंत्रमुग्ध झाले.
भाग्यश्री गोडबोले, प्रज्ञा देशपांडे, तेजश्री पिटके यांनी बंदिशींचे सादरीकरण केले. ज्येष्ठ संवादिनीवादक प्रमोद मराठे, तसेच त्यांची शिष्या दीप्ती कुलकर्णी यांनी संवादिनीवर, अमित जोशी यांनी तबल्यावर साथसंगत केली. अपर्णा जोशी यांनी निवेदन केले. प्रत्येक देवीचे रुप, स्वभाव लक्षात घेऊन भाग्यश्री यांनी हंसध्वनी, सरस्वती, यमन, कलावती, गौरी, हिंडोल, परमेश्वरी, नारायणी, भीमपलास या रागांत विविध तालांत बांधलेल्या बंदिशींनी रसिकांना मोहिनी घातली. माजी नगरसेविका गायत्री खडके यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.