हास्ययोग म्हणजे तणावमुक्त, आनंदी जीवनाचे प्रभावी औषध

पुणे, ता. : “नवचैतन्य हास्ययोग परिवार हे खऱ्या अर्थाने पुण्याचे वैभव आहे. हास्ययोग आनंदी जीवनाची किल्ली असून, हास्याची ही चळवळ पुण्याच्या कानाकोपऱ्यात अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी ठिकठिकाणी हास्यदूत निर्माण व्हावेत,” असे प्रतिपादन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले. हास्ययोग म्हणजे आनंदी जीवांचे टॉनिक आहे, असे मधुमेहतज्ज्ञ डॉ. भाग्येश कुलकर्णी यांनी नमूद केले.

नवचैतन्य हास्ययोग परिवाराचा वर्धापन दिन गणेश कला क्रीडा मंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हास्ययोग परिवारातील हजारो सदस्य उत्साहाने उपस्थित होते. नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या वर्धापन दिनानिमित्त नवचैतन्य आरोग्य संहिता या अधिकृत व्यायाम पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी झाले. नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे यांनी ८९ व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्ताने पुणेरी पगडी आणि मानाची शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

प्रसंगी व्यासपीठावर प्रख्यात मधुमेहतज्ज्ञ डॉ. भाग्येश कुलकर्णी, मनस्विनी सारीजच्या गोदावरी रुकारी, द्वारकादास शामकुमार टेक्स्टाईल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक द्वारकादास माहेश्वरी, पुणे मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठीया, माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले, ज्येष्ठ उद्योजक प्रकाश धोका, सोलारीस क्लबच्या डॉ. अमृता दळवी, संस्थेचे मुख्य समन्वय मकरंद टिल्लू, उपाध्यक्ष सौ. सुमन काटे, उपाध्यक्ष विजय भोसले, सचिव पोपटलाल शिंगवी, खजिनदार ऍड. रामचंद्र राऊत, विश्वस्त  प्रमोद ढेपे, जयंत दशपुत्रे, एकनाथ सुगावकर, अतुल सलागरे, दत्तात्रय कुंदेन, हरीश पाठक, सुनील देशपांडे आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “नवचैतन्य हास्ययोग परिवाराने ‘हसरे पुणे’ करण्यात मोठे योगदान दिले आहे. परिवाराने एक लाख सदस्य करण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले आहे. हा केवळ एक परिवार नसून, ही एक मोठी चळवळ आहे. मी स्वतः या परिवाराचा भाग असून त्याचा वाढणारा प्रतिसाद अनुभवतो आहे.”

राजेंद्र बाठीया म्हणाले, “आम्ही व्यापारी दिवसभरामध्ये आमच्या कामांमध्ये व्यस्त असतो. त्यामुळे असे निखळ हास्य आमच्या वाट्याला बरेचदा येत नाही. नवचैतन्य हास्ययोग परिवाराने हजारो लोकांच्या जीवनामध्ये जे हास्य पसरवले आहे, त्याचा अभिमान वाटतो.”

प्रकाश धोका म्हणाले, हास्य क्लब ही संकल्पना पुणेकरांनी स्वीकारली आणि ती वाढवली. त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळाली. या संकल्पनेमुळे लोकांना शारीरिक व मानसिक आधार मिळाला आहे.

‘आगामी काळात हास्ययोग आनंदयात्रा काढून ७० लाख लोकसंख्येच्या पुण्यामध्ये एक लाख लोकांना हास्ययोग परिवाराशी जोडण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम सुरू आहे,’ असे मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू यांनी सांगितले.

विठ्ठल काटे आणि उपाध्यक्ष सुमन काटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. अमृता दळवी, शब्दसारथीचे संचालक पराग पोतदार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रख्यात वक्ते प्राध्यापक गणेश शिंदे यांचे जीवन सुंदर आहे या विषयावर उत्कृष्ट व्याख्यान झाले. सुमारे दोन हजाराहून अधिक लोकांच्या उपस्थितीमध्ये ६०० घेऊन अधिक ज्येष्ठांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. सूत्रसंचालन सुभाष राजवाड यांनी केले. विजय भोसले यांनी आभार मानले.