नात्यापलीकडे जाऊन मुलींनी एकमेकींना सहाय्य करावे

पुणे: प्राईड ऑफ ओनरशिप, अशी अभिमानाची भावना विद्यार्थी साहाय्यक समितीच्या विद्यार्थ्यांमध्ये मला जाणवली. मुलींनी याच भावनेने सदैव एकमेकींच्या साह्यासाठी तत्पर असले पाहिजे. नाते असो वा नसो, स्त्री या एकाच नात्याचा विचार करून साह्य केले पाहिजे. व्यक्तीच्या यशामागे अनेक घटक असतात. माझ्या आईचे असेच स्थान माझ्या आयुष्यात आहे. तिचे नाव नूतन वसतिगृहाला दिले आहे, याचे समाधान वाटते, असे मनोगत अमेरिकास्थित उद्योजक दांपत्य विभावरी आणि गिरीश गायतोंडे यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.  

निमित्त होते, विद्यार्थी साहाय्यक समितीच्या पुण्यातील मुलींसाठीच्या नूतन वसतिगृहाच्या उद्घाटन सोहळ्याचे. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ उद्योजक आणि समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार होते. अमेरिकास्थित देणगीदार विभावरी आणि गिरीश गायतोंडे यांच्या हस्ते श्रीमती लतिका जयवंत गायतोंडे मुलींचे वसतिगृह या नूतन वास्तूचे उद्घाटन साजरे झाले.

सेनापती बापट रस्त्यावरील शिवाजी हौसिंग सोसायटीशेजारील लजपत संकुल येथे हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, कायम विश्वस्त भाऊसाहेब जाधव, मकरंद फडके, तुकाराम गायकवाड, संजय अमृते, रत्नाकर मते, प्रभाकर पाटील, चंद्रकांत कुलकर्णी, दुर्गेश पवार अन्य सल्लागार, पदाधिकारी, हिंतचिंतक उपस्थित होते.

मनोगत मांडताना विभावरी गायतोंडे म्हणाल्या, ‘अच्युतराव आपटे यांच्यापाशी असलेली दृष्टी आणि त्यांचा ध्यास महत्त्वाचा आहे. प्राईड आफ ओनरशिप, ही अभिमानाची भावना, येथील विद्यार्थ्यांमध्ये मला जाणवली. भगिनीभाव (सिस्टरहूड) आणि मैत्री, स्त्रियांमध्ये एकमेकींसाठी सदैव असली पाहिजे. नाते असो वा नसो, स्त्री या एकाच नात्याचा विचार करत, एकमेकींसाठी उभे राहिले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. गिरीश गायतोंडे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीच्या यशामागे तो एकटा नसतो. कुटुंबासह इतरही अनेक घटक असतात. माझ्यासाठी ते स्थान आई लतिका गायतोंडे यांचे आहे. या वसतिगृहाला तिचे नाव दिले आहे. समितीच्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी चालणारे हे कार्य पाहून तिला समाधान वाटेल, असा विश्वास मला वाटतो.

प्रतापराव पवार म्हणाले, विद्यार्थी हाच केंद्रबिंदू ठेवत,  नीतिमत्ता, पारदर्शकता आणि जबाबदारी मानून, अखंडित कार्यरत असणारी विद्यार्थी साहाय्यक समितीसारखी संस्था देशात दुसरी नसेल. उत्तम विद्यार्थी घडवून उत्तम समाजाच्या निर्मितीसाठी समिती कटिबद्ध आहे, सदैव राहील. समितीचा केंद्रबिंदू सुरवातीपासून विद्यार्थी हाच आहे, यापुढेही राहील. काळानुरुप शिक्षण, कौशल्य विकास करता यावा, त्यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यांच्यासाठी नव्या संधी तयार व्हाव्यात, हाच उद्देश आहे. समितीच्या माजी विद्यार्थ्यांनी समितीच्या प्रत्येक कार्याला लावलेला हातभार, दिलेले योगदान पाहता हा उद्देश सफल होत आहे. शिकण्याची आस असलेल्या प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे, या हेतूने समितीचे कार्य सुरू आहे आणि सदैव सुरू राहील.

यशोदा आपटे म्हणाल्या, समितीच्या धुरंधरांचे कार्य पाहिले, की आम्ही कस्पटासमान आहोत, असे वाटते. समिती १९५५ साली स्थापन झाली. मी स्वतः १९६१ साली अभियांत्रिकी पदवीधर झाले. आयआयटीमधून उच्चशिक्षण, पीएचडी आणि मग अध्यापन, केले. पण समितीने उभे केलेले कार्य विलक्षण आहे.

मकरंद फडके यांनी प्रास्ताविकात समितीचे संस्थापक अच्युतराव आपटे यांच्या स्वप्नाची पूर्ती झाल्याची भावना व्यक्त केली. समितीच्या वसतिगृहात किमान एक हजार विद्यार्थिनींची सोय झाली पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती. आज समितीच्या वसितगृहात ८०० विद्यार्थिनी आहेत. देणगीदारांमुळेच यासाठीचे निधी संकलन शक्य झाले. नूतन वसतिगृहाचे देणगीदार गायतोंडे दांपत्याला असलेली सामाजिक प्रश्नांची जाण, सामाजिक दायित्वाची भावना आणि चांगल्या कार्याला सर्वतोपरी साह्य करण्याची भूमिका, महत्त्वाची ठरल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी वसतिगृहाचे विविध देणगीदार, सीएसआर उपक्रमातून साह्य करणारे हितचिंतक, इमारतीच्या प्रत्यक्ष उभारणीत योगदान देणारी मंडळी, सर्वांचा पदाधिकार्यांच्या हस्ते कृतज्ञता सत्कार करण्यात आला. समितीच्या २०२४-२५ त्या वार्षिक अहवालाचे प्रकाशनही करण्यात आले. समितीच्या वसतिगृहात विद्यार्थिनी म्हणून वास्तव्य केलेल्या आणि पुढे कर्तृत्वाचे क्षितिज विस्तारणार्या स्नेहा फडके, अश्विनी सानप, डॉ. संगीता बर्वे, गायत्री पाठक आणि सुरेखा भणगे यांचा प्रातिनिधिक गौरव करण्यात आला. जगदीश दिवेकर यांनी यावेळी समितीला १० लाख रुपयांची देणगी दिली.  

विश्वस्त प्रीती राव यांनी परिचय करून दिला. विश्वस्त तुकाराम गायकवाड यांनी आभार मानले, तर विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. समितीच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन तसेच पसायदान सादर केले.