राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा आज मुंबईत पार पडला. प्रभादेवी येथील तनिष्काच्या निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने साखरपुड्याचा सोहळा संपन्न झाला. या खास क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या साखरपुड्याच्या निमित्ताने पवार कुटुंब पुन्हा एकत्र आले होते. युगेंद्र आणि तनिष्का दोघेही पारंपरिक पोशाखात अत्यंत सुंदर दिसत होते आणि त्यांच्या या खास दिवसासाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
या समारंभाला अजित पवार यांनी संपूर्ण कुटुंबासह उपस्थिती लावली. त्याचप्रमाणे शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह पवार कुटुंबातील अनेक सदस्य कार्यक्रमात सहभागी झाले. युगेंद्र हे अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र असून, काही महिन्यांपूर्वीच त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती, जरी त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
यापूर्वी एप्रिल महिन्यात अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा साखरपुडा ऋतुजा पाटील (उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या) यांच्याशी मोठ्या थाटामाटात पुण्यातील घोटावडे येथील फार्महाऊसवर पार पडला होता. या सोहळ्यातही पवार कुटुंब एकत्र जमले होते.
सध्या युगेंद्र आणि तनिष्काच्या साखरपुड्याचे फोटो व व्हिडीओ पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचं वातावरण आहे.