पुणे | कॅफेमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी, ब्लॅकमेलिंगला कंटाळून २२ वर्षीय तरुणीची आत्महत्या – दोघे आरोपी अटकेत, एक फरार

पुणे, वडगाव मावळ – पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगाव मावळ येथील २२ वर्षीय तरुणीने सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीच्या कॅफेमधील काही खासगी फोटो रणजित देशमुख या आरोपीकडे होते. तो हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर मानसिक दबाव टाकत होता. यामध्ये त्याचे मित्र अभिषेक ढोरे आणि प्राण येवले यांचा देखील सहभाग होता. हे तिघे पीडित तरुणीला रणजितसोबत मैत्री ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होते.

आरोपींचा त्रास इतका वाढला की त्यांनी पीडितेच्या लग्नात अडथळा आणण्याची आणि तिच्या आईवडिलांना मारून टाकण्याची धमकी देखील दिली. हा त्रास डिसेंबर २०२४ पासून सुरू होता. अखेर, या मानसिक छळाला कंटाळून पीडित तरुणीने आपल्या राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेनंतर मुलीच्या कुटुंबियांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्वरीत कारवाई करत रणजित देशमुख आणि अभिषेक ढोरे या दोघांना अटक केली असून प्राण येवले हा आरोपी अद्याप फरार आहे.

या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.