‘महावतार नरसिंह’चा बॉक्स ऑफिसवर गजर; फक्त १५ कोटींच्या खर्चात कमावले तब्बल २५०% नफा!

मुंबई : ‘महावतार नरसिंह’ (Mahavatar Narsimha) हा अ‍ॅनिमेटेड चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याबाबत फारशी चर्चा नव्हती. मात्र प्रदर्शित होताच या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘सैय्यारा’, ‘सन ऑफ सरदार 2’ आणि ‘धडक 2’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांना जोरदार टक्कर देत ‘महावतार नरसिंह’ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे.

८व्या दिवशीही मजबूत कामगिरी
चित्रपटाने आठव्या दिवशी म्हणजे दुसऱ्या शुक्रवारी एकट्या भारतात ७.५ कोटींची कमाई केली. हिंदी भाषिक प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच एकूण ५.३० कोटी रुपये भारतात मिळवले, तर बाकी कमाई तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांतून झाली.

एकूण कमाई
आत्तापर्यंत ‘महावतार नरसिंह’ने एकूण ५२.६२ कोटी रुपये कमावले असून करासह ही रक्कम ६२.०९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. होम्बळे फिल्म्सच्या बॅनरखाली बनवलेल्या या चित्रपटाने सर्वच भाषांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे.

भाषावार कमाईचा तपशील

  • हिंदी: ₹३८.१२ कोटी

  • तेलुगू: ₹१२.६७ कोटी

  • कन्नड: ₹१.१६ कोटी

  • तमिळ: ₹५१ लाख

  • मल्याळम: ₹१६ लाख

  • एकूण: ₹५२.६२ कोटी

२०२५ मधील सर्वात फायदेशीर चित्रपटांपैकी एक
१५ कोटींच्या खर्चात बनवलेला हा चित्रपट केवळ ८ दिवसांत २५०.८% नफा कमावून सुपरहिट ठरला आहे. २०२५ मधील सर्वाधिक नफा मिळवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाने आपले स्थान पक्के केले आहे. याआधी ‘टुरिस्ट फॅमिली’ या तमिळ चित्रपटाने २८४.६% नफा मिळवला होता, पण आता ‘महावतार नरसिंह’ त्याचा रेकॉर्ड मोडेल अशी जोरदार चर्चा आहे.

शनिवार (२ ऑगस्ट) आणि रविवार (३ ऑगस्ट) रोजी चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.