पुरंदर तालुक्यातील मावडी (क. प.) येथे शेतातील रस्त्यावरून निर्माण झालेल्या वादातून सख्ख्या भावाने आपल्या मोठ्या भावाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, जेजुरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीस अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मावडी (क. प.) गावातील बाजरीच्या शेतात ज्ञानदेव लक्ष्मण भामे (वय ८२) हे मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालात डोक्याला खोल जखम झाल्यामुळे झालेल्या रक्तस्रावाने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी खुनाच्या शक्यतेने तपासाची दिशा बदलली.
तपासादरम्यान पोलिसांना समजले की, मयत ज्ञानदेव भामे आणि त्यांचे लहान बंधू चांगदेव लक्ष्मण भामे यांच्यामध्ये शेतातील रस्त्यावरून सतत वाद होत होते. पोलिसांनी चांगदेव याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. सुरुवातीला त्याने गुन्हा नाकारला, मात्र पोलिसांच्या कसून चौकशीनंतर त्याने खुनाची कबुली दिली.
चांगदेवने सांगितले की, ३१ जुलै रोजी ज्ञानदेव भामे यांनी शेतातील रस्ता अडविला होता. त्यातून दोघांत वाद झाला आणि संतापाच्या भरात चांगदेवने भावाला लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत डोक्याला गंभीर इजा झाल्याने ज्ञानदेव यांचा मृत्यू झाला.
जेजुरी पोलिसांनी २ ऑगस्ट रोजी आरोपी चांगदेव भामे याला अटक केली असून, अवघ्या २४ तासांत तपास पूर्ण करत गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला. ही घटना सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली असून, शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच भावाचा जीव घेतल्यामुळे समाजमन हादरून गेले आहे.